मुंबई : दहीहंडी उत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दहीहंडी सरावाच्या माध्यमातून ‘बिझनेस नेटवर्किंग’ करणाऱ्या भांडुप (पश्चिम) येथील शिवनेरी गोविंदा पथकाच्या उपक्रमाची चर्चा रंगली आहे. शिवनेरी गोविंदा पथकातील गोविंदा पदवीधर व उच्चशिक्षित आहेत. यामध्ये अभियंते, सीए, पोलिस कर्मचारी, सरकारी अधिकारी, वैद्यकीय क्षेत्र आणि कॉर्पोरेट व्यावसायिकांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे राजकीय मंडळींकडून एकही रुपया न घेता बिझनेस नेटवर्किंगच्या मदतीने स्वःखर्चाने दहीहंडी पथकाच्या खर्चाचे नियोजन केले जाते.

शिवनेरी गोविंदा पथकातील ९० टक्के गोविंदा पदवीधर असून अनेकजण शिकत आहेत. यापैकी अनेकजण दिवसभर कार्यालयात तसेच विविध ठिकाणी फिरतीचे काम करून रात्री ८ वाजता मैदानावर दाखल होतात आणि मेहनत व शिस्तीचा संगम साधत रात्री १ वाजेपर्यंत सराव करतात. यादरम्यान जेव्हा क्षणभर विश्रांती घेतली जाते, तेव्हा ‘बिझनेस नेटवर्किंग’चा तास सुरु होतो. एकमेकांमध्ये नोकरीसंदर्भात चर्चा केली जाते आणि युवा म्हणजेच नुकतेच पदवीधर झालेल्या गोविंदांना नोकरी शोधण्यास मदत केली जाते. तसेच इतर कंपन्यांमध्ये त्यांची शिफारसही केली जाते. शिवनेरी गोविंदा पथकाचे व्यवस्थापक अतुल फोपळे स्वतः वास्तुविशारद आहेत. त्यांनी पथकातील एका मुलाला पदवीधर झाल्यानंतर स्वतःकडे इलेक्ट्रिशिअनचे काम दिले आणि आजघडीला हा मुलगा स्वतंत्र इलेक्ट्रिशिअन म्हणून काम करीत असून इतरांनाही काम देत आहे. तसेच बांधकाम व्यवसायातील व्यक्ती अंतर्गत सजावट व इलेक्ट्रिकचे काम पथकातील व्यक्तीलाच मिळवून देते. तर विक्री आणि विपणन (सेल्स आणि मार्केटिंग) क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने १० ते १५ जणांना काम मिळवून दिले आहे.

दरम्यान, शिवनेरी गोविंदा पथकात तीन पिढ्या एकत्र असल्याचेही पाहायला मिळत आहे. अरविंद साळवी यांनी २००७ साली शिवनेरी गोविंदा पथकाची स्थापना केली. त्यानंतर त्यांचा मुलगा संकेत साळवी गोविंदा पथकात असून वैभव मोरे यांच्यासह प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. तर संकेत साळवी यांची छोटी मुलगी त्विशा साळवी ही सुद्धा नित्यनेमाने दहीहंडीचा सराव पाहण्यासाठी मैदानावर येते आणि विविध दहीहंडीच्या मनोऱ्यातील विविध बाजू जाणून घेते. सुरुवातीला ४ थरांपासून सुरु झालेला प्रवास आज ८ थरांपर्यंत येऊन पोहोचला आहे. तसेच यंदा शिवनेरी गोविंदा पथक (लखनऊ पँथर्स) ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे.

‘बिझनेस नेटवर्किंग’च्या माध्यमातून आमच्या पथकातील प्रत्येक गोविंदाला नोकरी तसेच काम मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसेच दहीहंडी सरावाच्या वेळी सर्व सुविधा मैदानावर उपलब्ध असतात आणि गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. आजवर आम्ही घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे फळ आम्हाला मिळत असून ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत’, असे शिवनेरी गोविंदा पथकातील अनिकेत संकपाळ याने सांगितले.