राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून वाद पेटला आहे. यासंदर्भात जवळपास दोन महिने चर्चा झाल्यानंतर अखेर आज पालिका प्रशासनाने पोलीस विभागाकडून आलेल्या अभिप्रायानुसार निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास शिंदे गट आणि शिवसेना या दोघांनाही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता हा सगळा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. शिवसेनेनं आधीच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली असताना त्यावर शिंदे गटाकडून मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली आहे.

आज सुनावणी…

शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यातच शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी न्यायालयात मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला असून त्यावर न्यायालय जो निकाल देईल, तो मान्य असेल, अशी भूमिका शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केली आहे.

शिंदे गटाची याचिका

शिवाजी पार्क दसरा मेळावा प्रकरणात शिंदे गटाकडून मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची मागणी सदा सरवणकर यांनी याचिकेत केली आहे.

मोठी बातमी! शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!

bmc letter on dussehra melawa 2022 permission
दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्याबाबतचं पालिकेचं पत्र!

उद्धव ठाकरे यांचा गट त्यांची शिवसेना खरी असल्याचा दावा करून न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करून अनिल देसाई यांनी केलेली याचिका फेटाळण्याची मागणी सरवणकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेना खरी असून शिवाजी पार्कवर आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याची मागणी यातून करण्यात आली आहे.