scorecardresearch

मोठी बातमी! शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!

दसरा मेळाव्यासाठी कुणालाच परवानगी नाही, आता लक्ष उच्च न्यायालयातील सुनावणीकडे!

मोठी बातमी! शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!
प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा एकीकडे थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली असताना दुसरीकडे मुंबई पालिकेनंच यासंदर्भात मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगर पालिकेनं एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारण्यात आल्याचं पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रातून दिसून येत आहे. या पार्श्वभूमवीर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून आता शिवसेनेनं उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

‘दोन्ही परस्परविरोधी अर्जदारांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले. मात्र, कोणत्याही एका अर्जदाराला त्यासाठी परवानगी दिल्यास त्यातून शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो’, असं स्पष्टीकरण परवानगी नाकारताना प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

“न्यायालय जो निर्णय देईल, तो मान्य करू”

“बीकेसीमध्ये त्यांना परवानगी मिळाली आहे. पण तरीही शिवाजी पार्कमध्ये घुसून ते परवानगी मागत आहेत. पोलीस किंवा पालिका प्रशासन या दबावाला बळी पडणार नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा त्यांच्यावर ढकलला जाईल, या दृष्टीने त्यांनी परवानगी नाकारली आहे. आता न्यायालयाचा जो निर्णय येईल, तो आम्ही स्वीकारू”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात बोलताना दिली आहे.

bmc letter on dussehra melawa 2022 permission
दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्याबाबतचं पालिकेचं पत्र!

“हा कळीचा आणि रडीचा डाव आहे. एकनाथ शिंदेही ठाकरे सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर होते. त्यांच्यासारख्यांना फोडण्यात आलं. मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्रात रडीचा आणि कळीचा डाव चालू आहे. या डावाला जनता फसणार नाही.जनता हे सगळं बघते आहे, असंही किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

शिंदे गट परवानगीसाठी पुन्हा प्रयत्न करणार

“आम्ही पुन्हा एकदा पालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटू आणि आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण शिवसेना आमच्यासोबत आहे. सर्वाधिक आमदार, खासदार, पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना कोणती हा प्रश्नच उद्भवत नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

“कदाचित काही लोकांनी मैदानात घुसून मेळावा घेऊ वगैरेची वक्तव्य केली होती. त्यावरून प्रशासनाला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न वाटला असेल. त्यामुळे हे कारण देण्यात आलं असेल”, असं म्हणत नरेश म्हस्केंनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bmc rejected permission to shivsena eknath shinde group for dussehra melawa 2022 pmw

ताज्या बातम्या