दसरा मेळाव्याच्या जागेवरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. अशात मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत, दोन्ही गटाला शिवाजी पार्कवरील परवानगी नाकारली आहे. तसेच हा आता विषय आता न्यायालयातही पोहोचला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते”, गटमेळाव्यातील टीकेवरून नारायण राणेंचा हल्लाबोल

काय म्हणाले अंबादास दानवे?

“न्यायालयात जी सुनावनी सुरू आहे. त्याचा निकाल आमच्या बाजूने लागेन, असा विश्वास आम्हाला आहे. शिवाजी पार्कवर आम्ही सभा घेतली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं नाही. जर आम्हाला परवानगी नाही मिळाली तरीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.

हेही वाचा – मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे शिंदे सरकारचे संकेत; शंभूराज देसाई म्हणाले, “येत्या १५ दिवसांत…”

“शिवतीर्था संदर्भात महापालिकेने परवानगी नाकारली असेल, परंतु शिवसेना न्यायालयात गेली आहे. मात्र, सातत्याने शिवसेनेचा दसरा मेळावा याच शिवतीर्थावर होतो आहे. आधी शिवसेना प्रमुख आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे या वर्षीही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हेच या मेळाव्याला शिवतीर्थावरून संबोधित करतील”, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.