मुंबईमधील माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांच्या अंगाला छुपा स्पर्श करुन छेडछाड करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन कोणीच तक्रार न केल्याने त्याची सुटका केली. मात्र या आरोपीला शिवसेने नेते नितीन नांदगावकर यांनी मारहाण केली आहे. नांदगावकरांनी या व्यक्तीला मारहाण करताना व्हिडिओ थेट फेसबुकवरुन लाईव्ह केला आहे. या व्हिडिओमध्ये नांदगावकर या तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडिओमधील तरुण आपला गुन्हा मान्य करताना दिसत आहे. या आरोपीच्या हातांवर पाय ठेऊन ‘याच हातांनी महिलांना स्पर्श केला’ असं म्हणत नांदगावकरांनी त्याला मारहाण केली. काही तासांमध्ये हा व्हिडिओ ११ हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे. मात्र दुसरीकडे राज्यामध्ये शिवसेनेचीच सत्ता असताना अशाप्रकारे शिवसेनेचाच नेता कायदा हातात घेत असल्याने शिवसेनेचाच कायदा सुव्यवस्थेवर विश्वास नाही का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय आहे?

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेडछाड काढत विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पाच फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र महिलांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने फक्त चोरीचा गुन्हा दाखल होत या विकृताची सुटका करण्यात आली. ही व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत कैद झालं होतं. इतकंच नाही तर तो रेल्वे स्थानक परिसरामध्येच हस्तमैथून देखील करत होता. दोन महिलांना यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली पण याप्रकरणी औपचारिक तक्रार करण्यास महिलांनी नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी यानंतर सापळा रचत आरोपीला अटक केली. मात्र त्याच्याविरोधात एकाही महिलेने तक्रार दाखल केली नसल्याने पोलीस लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करु शकले नाहीत. पोलिसांनी पीडित महिलांना पुढे येऊन एफआयआर दाखल करण्याचं आवाहन केलं होतं.

नांदगावकरांनी काय केलं?

नांदगावकर यांनी फेसबुकवर या व्यक्तीकडून गुन्हा कबुल करुन घेत त्याला मारहाण केली. ‘चुकीला माफी नाही’ या मथळ्याखाली त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. “गेल्या १५ दिवसांपासून मी आतुरतेने या आरोपीची वाट बघतोय. याने माटुंगा स्थानकामध्ये वेगवेगळ्या महिलांना हात लावायचा, त्यांची छेड काढायचा आणि पळून जायचा. त्या मुलींसाठी मी हा माणूस इथे आणला आहे,” असं म्हणत नांदगावकर व्हिडिओमध्ये तरुणाला मारहाण करताना दिसतात. रजिऊर खान असं या तरुणाचं नाव आहे. “माझ्यावर पोलीस कारवाईही करतील पण मला महाराष्ट्रातल्या माता-भगिनींना एक मेसेज द्यायचाय की मुंबईमध्ये अशाप्रकारची विकृती खपवून घेतली जाणार नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी माझ्या आया-बहिणींचं संरक्षण करत राहणार,” असं या व्हिडिओमध्ये नांदगावकर म्हणाले आहेत.

पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

‘चुकीला माफी नाही’ या मथळ्याखाली पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओबरोबर एक पोस्टही नांदगावकर यांनी केली आहे. “महाराष्ट्रातील माझ्या माता -भगिनींना समर्पित. जिथे जिथे मुलींवर अत्याचार होतील आणि ते नराधम वासनेने पछाडलेले मोकाट फिरत असतील तिथे तिथे जाऊन त्यांना ठोकणार. अशा नराधमांचे हात-पाय शाबूत राहणार नाहीत हा माझा शब्द. तो कोणत्याही जाती-धर्मचा असू देत त्याची धिंड काढली जाईल. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींच्या संरक्षणाची जवाबदारी घेतो. रयतेच्या राज्यात माता- भगिनींना ह्यापुढे कोणीच वेड्या वाकड्या नजरेने बघू नये,” असा इशारा नांदगावकर यांनी पोस्टमधून दिला आहे. “५ दिवस रोज माटुंगा ब्रिजवर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना कुठेही हात लावून पसार होणारा विकृत त्याची हिम्मत होते कशी? १५ दिवसापासून वाट पाहत होतो. घरचा पत्ता खोटा दिल्याने गेले कित्येक दिवस त्याला शोधण्यात गेले. या विकृताची जवाबदारी कोण घेणार?,” असा सवालही नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. “अशा विकृतीचे जागेवर हात छाटले गेले पाहिजेत. मला पर्वा नाही माझे काय होईल याची पण अशा समाजकंटकांना नागडा करणार,” असंही या पोस्टच्या शेवटी नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे.

नांदगावकरांच्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चार हजारहून अधिक जणांनी यावर कमेंट केल्या आहेत. यापैकी अनेकांनी महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे असं मत नोंदवलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader nitin nandgaonkar beat man molesting women at matunga railway station scsg
First published on: 18-02-2020 at 09:12 IST