बिहारमध्ये विकासाच्या, कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. पण जर मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. एएनआयशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीवरुन प्रश्न उपस्थित करत करोना संपलाय का ? अशी विचारणा केली. ‘बिहार निवडणुकीसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे हे देशाला सांगावं,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

“विधानसभेची मुदत संपत असेल तर निवडणूक झालीच पाहिजे. पण बिहारमध्ये करोना संपलाय का हेदेखील पाहिलं पाहिजे. जर करोना संपला नसेल तर तुम्ही निवडणूक कशी घेणार आहात, प्रचारसभा कशा होणार?. मतदान तर ऑनलाइन करु शकत नाही, त्यासाठी जाऊन रांगेत उभं राहावं लागेल. सोबत मतदानाची टक्केवारीही कमी नाही झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं गरजेचं असून गरीब लोक आज घराबाहेर पडत नाहीयेत. बिहार एक मोठं राज्य आहे. देशाच्या राजकारणात बिहारचं महत्व आहे. त्यामुळे तिथे निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे ? काय व्यवस्था करण्यात आली आहे हे देशाला सांगावं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “…म्हणून सरकारनं शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये”

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीबाबत विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “मुंबईत अनेक लोक उत्तर प्रदेशातील आहेत. स्पॉट बॉयपासून ते अनेक मोठे दिग्दर्शकही तेथील आहेत. अमिताभ बच्चनदेखील अलाहाबादचे आहेत. जर देशात अन्य कुठे फिल्मसिटी होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. कलाकार तर मुंबई सोडणार नाहीत. ते इथलं घर सोडून तिथं फिल्मसिटीत जाऊन राहतील असं तर होणार नाही. फिल्मसिटी फक्त शूटिंगसाठी वैगेरे असते. हैदराबादमधील रामोजी फिल्समिटीत मराठी कलाकार जाऊन शूटिंग करतात. विदेशातही जाऊन शूटिंग होत असते. ही इंडस्ट्री पाच लाख लोकांना रोजगार देते”.

आणखी वाचा- “सतत पवारांसोबत राहून राऊतांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली”

संजय राऊत यांनी ड्रग्ज प्रकरणी अनेक सेलिब्रेटींची चौकशी केली जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता एनसीबीला चौकशीचा अधिकार असून ते बोलावू शकतात असं सांगितलं.