कावेरी पाणीवाटपासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालावरुन कर्नाटकमध्ये हिंसाचार उसळला आहे. यावरुन शिवसेनेने कर्नाटकवर निशाणा साधला आहे. शेवटी कानडी लोकांना अन्याय काय असतो हे समजले. पण सीमा भागातील मराठी माणसांवर कानडी लोक जे अत्याचार करतात त्याला काय म्हणायचे असा खोचक सवाल सेनेने उपस्थित केला आहे.
कावेरी नदीतून कर्नाटकने तामिळनाडूला दररोज १५ हजार क्युसेक्स पाणी द्यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यावरुन कर्नाटकमध्ये हिंसाचार उसळला आहे. कर्नाटकच्या जनतेने रस्त्यावर उतरुन या निर्णयाचा विरोध केला. कर्नाटकमधील तामिळ संस्थाचे कार्यालय फोडण्यात आले होते. शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून कर्नाटकवर टीका केली आहे. मराठी लोकांना शत्रू समजून कानडी जनतेने त्यांच्यावर अत्याचार केले. मराठी शाळांची मुस्कटदाबी केली. हे सगळे प्रकार अन्यायाचे टोक आहे. पण त्याच कर्नाटकला तामिळनाडूसाठी पाणी सोडणे हे अन्यायकारक वाटत असेल तर तो ढोंगीपणाच म्हणावा लागेल अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे. पाण्यासाठी भांडणा-यांना मराठी माणसांच्या न्यायासाठी सांडलेल्या रक्ताचे मोल वाटू नये हे दुर्दैव असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

काश्मिरी जनतेला मलालाची साथ, भारत-पाकला तोडगा काढण्याचे आवाहन

राज्याराज्यांमध्ये सुरु असलेल्या वादावरही शिवसेनेने खंत व्यक्त केली आहे. पाण्यासाठी दोन राज्य किंवा जिल्हे एकमेकांशी भांडतात. हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी भूषणावह चित्र नाही अशा शब्दात शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. दुसर्‍यांवरील अन्याय हा स्वत:साठी न्याय व दुसर्‍यांना मिळालेला न्याय हा स्वत:वरील अन्याय ठरतो तेव्हा त्या राज्याचे मानसिक संतुलन बिघडले असे समजायला हवे. दुर्दैवाने देशाच्या ब-याच भागात अशी स्थिती असल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.