केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. न्यायालयानेही ठाकरे गटाची याचिका मान्य केली. तसेच शिंदे गट आणि आयोगाला नोटीस बजावत दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आयोगावर टीका करत गंभीर आरोप केला.
अरविंद सावंत म्हणाले, “मी वकील नाही, मात्र नागरिक म्हणून याकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की, या प्रकरणातील घटनाक्रम पाहण्यात येणार की नाही. हा घटनाक्रम आणि शेड्युल दहा याची सांगड घातली की, अज्ञानी व्यक्तीही सांगेल की याचा निर्णय काय व्हायला हवा. संविधानाला डावलून निर्णय घेतले जाणार असतील, तर कठीण आहे.”
“निवडणूक आयोगाचे प्रमुख विकले गेले आहेत”
“आजची सुनावणी ज्याप्रकारे झाले त्यावरून आम्हाला न्याय मिळायला हवा असं वाटतं. निवडणूक आयोग ज्याप्रकारे वागलं ते पाहता आयोगाचे प्रमुख विकले गेले आहेत. त्यांनी बाजार मांडला आहे. तुम्ही आमच्या बाजूने निकाल द्या, आम्ही तुम्हाला राज्यपाल करतो, असं सुरू आहे. याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयातही बोलू. आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या मुळावर येणार आहे. मी स्पष्ट बोलतो की, आयोग गुलाम आहे,” असा गंभीर आरोप अरविंद सावंत यांनी केला.
“आयोगाच्या निर्णयाला कुठेही स्थगिती दिली नाही”
दरम्यान, या सुनावणीवर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कुठेही स्थगिती दिली नाही. कपिल सिब्बल यांनी व्हिप लावून आमदारांना अपात्र केलं जाऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त केली. तसेच संपत्ती व बँक खात्यातील निधीचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.”