मुंबई महानगपालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेने बुधवारी वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. जीएसटीमुळे मुंबई महानगपालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय घट होणार असल्याने सेनेने सुरूवातीपासूनच जीएसटी विधेयकाबाबत नाराजची सूर लावला आहे. जगभरात ज्या देशांनी ‘जीएसटी’चा स्वीकार केला त्या देशांना नंतर माघारच घ्यावी लागली. ज्या सरकारांनी ‘जीएसटी’चा ढोल वाजवला ती सरकारे पुन्हा निवडून आली नाहीत, असा इशारा सेनेकडून देण्यात आला आहे. अंधश्रद्धा म्हणा की भुताटकी, जीएसटीच्या बाबतीत आहे, त्यावर काय तोडगा काढणार?, असा सवाल सेनेने ‘सामना’तील अग्रलेखात उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणाने वचन दिले आहे की, जीएसटीमुळे महाराष्ट्राचे एक रुपयाचेही नुकसान होणार नाही. मुंबई महानगरपालिकेला नुकसानभरपाईच्या पैशासाठी राज्य किंवा केंद्र सरकारच्या तोंडाकडे पाहावे लागणार नाही. राज्याच्या स्वायत्ततेला व मुंबई महानगरपालिकेच्या स्वाभिमानाला नख लागणार नाही, अशी वचने जरी आज दिली असली तरी शेवटी मुंबईच्या प्रश्‍नी आपल्याला अति सावधान राहावेच लागेल, असे अग्रलेखात म्हटले आहे.
शिवसेनेला  मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाची चिंता आहे. जकात कर रद्द होणार असल्याने महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत काय असेल किंवा नुकसानभरपाई कशी मिळणार, असा मुद्दा शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला होता. जीएसटी करप्रणालीमुळे मुंबईची आर्थिक कोंडी होऊ शकते व संपूर्ण देशाला आर्थिक आधार देणार्‍या मुंबईवर हाती कटोरा घेऊन भीक मागण्याची वेळ येऊ शकेल. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा, मुंबईचे पंख छाटण्याचा प्रयोग यापूर्वीही झालाय, पण मराठी माणसाने डरकाळी फोडताच आणि वाघाच्या पंजाने महाराष्ट्रद्रोही जायबंदी होताच हे अघोरी प्रयत्न थंड पडले, अशी आठवणही सेनेने भाजपला करून दिली आहे.