स्थानिक संस्था करातील (एलबीटी) जाचक नियमाविरोधात राज्यभरात पुकारलेल्या ‘बंद’ ला ठाणे तसेच नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त पाठिंबा दिला. बंदची आधीच चाहूल असल्याने नागरिकांनी आदल्या दिवशीच खरेदी केली होती. तसेच दोन्ही शहरातील सर्वच दुकाने बंद असली तरी वाहतूक व्यवस्था आणि जनजीवन सुरळीत होते. त्यामुळे या बंदचा फारसा परिणाम नागरिकांवर झाला नसल्याचे दिसून आले. राज्यभरातही व्यापाऱ्यांनी बंद कडकडीत पाळला.
स्थानिक संस्था करातील काही जाचक नियमांमुळे व्यापाऱ्यांकडून त्यास विरोध होऊ लागला असून त्याविरोधात व्यापाऱ्यांनी सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती. त्यानुसार, ठाणे व्यापार उद्योग महासंघाने या आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते. त्यानुसार सोमवार सकाळपासूनच ठाण्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. त्यामुळे एरवी गर्दीने गजबजलेली शहरातील वेगवेगळ्या भागांतील तसेच बाजार पेठेतील दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. ठाण्यातील व्यापाऱ्यांनी गावदेवी ते महापालिका, असा मोर्चा काढून एलबीटी विरोधात घोषणा दिल्या. तसेच ठाणे व्यापार उद्योग महासंघाच्यावतीने महापालिका आयुक्तांना विविध मागण्यांचे निवदेन देण्यात आले. त्यावेळी महापालिकेच्यावतीने शक्य तितके सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी मुकेश सावला यांनी दिली.
नवी मुंबईतील सुमारे २५ हजार घाऊक तसेच किरकोळ व्यापारी ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यामुळे शहरातील दुकाने बंद होती. तसेच व्यापाऱ्यांचे आंदोलन शांततेमध्ये पार पडले.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील चार बाजारपेठा मात्र सुरू होत्या तर मसाला बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. या बाजारपेठेतील सुमारे एक हजार व्यापारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे पाचशे कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या बाजारपेठेचा कारभार आज पूर्णपणे ठप्प झाला, अशी माहिती नवीमुंबई र्मचट असोशिएशनचे अध्यक्ष किर्ती राणा यांनी दिली.