मुंबई : श्रावण महिन्यातील व्रत, परंपरा आणि उपवासांमुळे मासळी बाजारात माशांचे दर घसरले आहेत. नेहमी प्रचंड मागणी असणारे पापलेट, सुरमई, हलवा या माशांचे दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. माशांचे दर घटले असले तरी श्रावण, सणासुदीमुळे मांसाहारी मंडळींनी मासळी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. आधीच मागणी नाही, त्यात दरही घरसल्यामुळे मासे विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत आहे. ही स्थिती गणपती विसर्जनापर्यंत सारखीच राहण्याची शक्यता मासळी व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.

पावसाळ्यात आधीच समुद्र खवळलेला असल्यामुळे समुद्रात बोटी जात नाहीत. त्यातच हाच काळ माशांच्या प्रजनानाचा असल्यामुळे माशांच्या प्रजाती टिकवण्यासाठी दरवर्षी जून ते जुलैदरम्यान राज्य शासनाकडून मासेमारीवर बंदी घातली जाते. ६० दिवसांचा मासेमारीबंदी कालावधी संपल्यानंतर ऑगस्टमध्ये मासेमारीला पुन्हा सुरुवात होते. या काळात विविध प्रजातींच्या माशांच्या संख्येत वाढ झाल्याने ऑगस्ट महिन्यात मासळी बाजारात चांगल्या दर्जाचे मासे येतात. तसेच, त्यांचा पुरवठा देखील अधिक असतो. मात्र, याच काळातील सण – उत्सव, श्रावणामुळे अनेक मांसाहारीप्रेमींच्या खाण्यावर बंधने येतात. यंदाही श्रावणात मांसाहार कमी झाल्याने मासळी बाजार ओस पडला आहे. परिणामी, माशांचे दर देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागणी आणि पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाल्याने मासे विक्रेते व व्यावसायिकांना आर्थिक फटका बसू लागला आहे. मात्र,

सध्या मासळीचे दर किती?

सध्या बाजारात एक किलो पापलेटचा दर ५५० रुपये आहे. जो तीन महिन्यांपूर्वी ९०० रुपये एवढा होता. पूर्वी ७०० रुपये किलोने मिळणारा हलवा मासा आता केवळ ४०० रुपयांमध्ये मिळत आहे. पूर्वी ३०० रुपये दर असलेल्या बोंबिलची आता ८० रुपयांमध्ये विक्री होत आहे. तसेच, तीन महिन्यांपूर्वी बांगडा २५० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. त्याची किंमत आता १०० रुपये प्रति किलोवर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी ८०० रुपये प्रति किलो दराने मिळणारी सुरमई आता ४०० रुपयांत विकली जात आहे.

बंदीचा कालावधी वाढवावा

मागणी आणि दर यातील नियंत्रणासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. मासेमारी बंदी कालावधी ६० ऐवजी ९० दिवसांचा केल्यास सकारात्मक बदल दिसू लागतील. तसेच, बाराही महिने मांसाहारप्रेमींना कमी दरात चांगले मासे उपलब्ध होतील, असे मत इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशनचे महाराष्ट्र समन्वयक देवेंद्र तांडेल यांनी व्यक्त केले.

मासळी हंगामाचा परिणाम

साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर आणि जानेवारी ते मे हे दोन महिने मासळी हंगाम असतात. पहिल्या हंगामात मासेमारी अधिक होते. तसेच, माशांच्या प्रजननामुळे समुद्रात विविध प्रजातींच्या माशांची संख्याही प्रचंड वाढलेली असते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात मासे विक्रीसाठी उपलब्ध होतात. तर, दुसऱ्या हंगामात काही प्रजातींचे मासे अन्य ठिकाणी स्थलांतर करतात. तसेच, माशांची संख्या या काळात घटत असल्याने मासेमारीही कमी होते.