शालेय शिक्षण विभागाची राज्य शिक्षण मंडळाला सूचना
अकरावी आणि बारावी परीक्षेत आता विद्यार्थ्यांना सोप्या प्रश्नपत्रिकेचाही पर्याय स्वीकारता येईल, अशी शक्यता आहे. नीट आणि जेईईसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून बदललेल्या अकरावीच्या परीक्षा पद्धतीमुळे नियमित विद्यार्थ्यांची अडचण होईल, अशी शिक्षकांची तक्रार आहे. त्यामुळे अकरावीबरोबरच बारावीसाठीही कठिण आणि सोपा अशा दोन प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार कराव्यात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीनुसार त्या निवडण्याची मुभा द्यावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाला दिली आहे. मंडळाने ही सूचना मान्य केल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना हे पयार्य उपलब्ध होतील.
अकरावीचा यंदाचा अभ्यासक्रम बदलण्यासोबतच परीक्षा पद्धतीमध्येही बदल करण्यात आला आहे. अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी हे राष्ट्रीय पातळीवरील प्रवेशपूर्व परीक्षा देण्यासाठी सक्षम असावेत या उद्देशाने अकरावीच्या परीक्षेची काठिण्य पातळी वाढविण्यात आली. परंतु जे विद्यार्थी नीट, जेईई सारख्या परीक्षा देऊ इच्छित नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी उच्च काठिण्य पातळीची परीक्षा का द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेला कठिण पातळीची प्रश्नपत्रिका आणि अन्य विद्यार्थ्यांना तुलनेने सोपी प्रश्नपत्रिका दिली जावी, असा विचार शालेय शिक्षण विभागाने अभ्यास मंडळातील तज्ज्ञांपुढे मांडला आहे. यावर विचार करून मार्च २०१९ मध्ये बारावीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा रितीने दोन पद्धतीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
आधी फसलेला प्रयोग
सीबीएससीने दहावीच्या पातळीवर शाळास्तरीय आणि मंडळस्तरावर अशा दोन प्रकारे परीक्षा घेण्याच प्रयोग केला होता. मात्र या प्रयोगाच्या अंमलबजावणीमध्ये आणि त्यानंतर आलेल्या अडचणी लक्षात घेऊन सीबीएससीने हा निर्णय रद्द केला. सीबीएससीचे हे उदाहरण समोर असतानाही अशाच प्रकारचा प्रयोग आता शालेय शिक्षण विभागाकडून केला जात आहे. दोन वेगवेगळ्या काठिण्या पातळीच्या परीक्षांमुळे भविष्यात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गुंतागुंतीची होण्याची भीती आहे.