अरूण टिक्कू खूनप्रकरणातील आरोपी मॉडेल सिमरन सूद हिला सात महिन्यांनंतर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र आणखी दोन प्रकरणात ती आरोपी असल्याने तिला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
सत्र न्यायालयाने शुक्रवारी तिला एक लाख रूपयांचा जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने तिला पारपत्र जमा करण्याचे, तसेच परवानगीशिवाय मुंबईबाहेर न जाण्याचेही आदेश दिले आहेत. परंतु तिच्यावर खोटे नाव आणि पत्ता देऊन पारपत्र मिळविल्याप्रकरणी, तसेच करण कुमार कक्कड खूनप्रकरणीसुद्धा तिच्यावर गुन्हा दाखल असल्याने जामीन मंजूर होऊनही तिला कारागृहातच राहावे लागणार आहे.
सिमरनसह या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिचा खास मित्र विजय पालांडे, धनंजय शिंदे आणि मनोज गजकोश अशा चौघांवरही आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार, सिमरन आणि पालांडेचे लग्न झाले असून दोघेही लोखंडवाला येथे भाडय़ाच्या घरात राहत होते. तिनेच अरूण टिक्कू आणि विजय पालांडेची भेट घडवून आणली. त्यानंतर पालांडेने टिक्कू यांचा मुलगा अनुज याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. एवढेच नव्हे, तर टिक्कू यांचा अंधेरी येथील फ्लॅट हडप करण्याचा आणि त्यासाठी त्यांचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने शिंदे आणि गजकोश यांच्या साथीने टिक्कू यांचा खून केला. याशिवाय त्याने टिक्कू यांचा मुलगा अनुज याच्याही हत्येचा कट रचला होता. त्यासाठी त्याने त्याला गोव्यालाही नेले होते. मात्र पोलिसांमुळे तो कट फसला.
२२ वर्षांनंतर तुरुंगातून आला आणि पुन्हा तुरुंगात गेला
व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने दोघांना अटक केली यातील एका आरोपीचे नाव मोहम्मद अर्शद शेख उर्फ छोटा अर्शद असून दोनच महिन्यांपूर्वी तो २२ वर्षांची शिक्षा भोगून आला होता. तर दुसरा आरोपी समीर लकडावाला हा कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याचा भाऊ आहे. विशेष म्हणजे, समीर लकडावाला हा जामीनावर सुटलेला आरोपी असून माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून वावरत होता.
विलेपार्ले येथे दरोडय़ाचा अयशस्वी प्रयत्न
विलेपार्ले येथे एकाच दिवसात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या असून एका दरोडय़ाचा प्रयत्न झाला. प्रविणा ठोंबरे (२९) ही सहार रोडवरुन मित्रासमवेत शुक्रवारी संध्याकाळी मोटरसायकलीवरुन घरी जात असताना एका मोटरसायकल स्वाराने प्रविणाच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी लुटून पळ काढला. या प्रकरणी आरोपी मारुती कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य घटनेत सुनिता पांचाळ (४९) ही महिला रस्त्यावरुन जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील २२ गॅ्रम वजनाची सोन्याची साखळी घेऊन पोबारा केला. दरम्यान, विलेपार्ले पूर्व येथील अग्रवाल मार्केटमधील ‘जय सर्वमंगल ज्वेलर्स’ या दुकानावर सहा अज्ञात इसमांनी शुक्रवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2012 रोजी प्रकाशित
मॉडेल सिमरन सूदला जामीन; सुटका मात्र नाही
अरूण टिक्कू खूनप्रकरणातील आरोपी मॉडेल सिमरन सूद हिला सात महिन्यांनंतर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र आणखी दोन प्रकरणात ती आरोपी असल्याने तिला तुरुंगातच राहावे लागणार आहे.

First published on: 25-11-2012 at 03:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simran sood gets bail not freedom