शीव उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा तिसरा टप्पा शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे शुक्रवार, ६ मार्च सकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवार, ९ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील. शीव उड्डाणपुलाच्या सांध्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे या पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत दोन टप्प्यांतील कामामध्ये ६४ बेअरिंग बदलण्यात आले आहेत. दुरुस्ती कामाचा तिसरा टप्पा शुक्रवारपासून सुरू होत असून यामध्ये १६ बेअरिंग बदलले जातील. या दरम्यान पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या पुलाचे बेअरिंग बदलण्यासाठी पुढील पाच आठवडे दर गुरुवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत पूल बंद ठेवावा लागेल.