संपूर्ण होरपळलेल्या अवस्थेत नयनाला शीव रुग्णालयात आणण्यात आले. तिची परिस्थिती पाहून आईने हंबडाच फोडला. चेहऱ्यासह संपूर्ण अंग जळालेले. त्वचा विद्रूप झाली होती. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर जखमा खोल असल्यामुळे जंतुसंसर्गाला अटकाव करण्यासाठी त्वचा रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला व रुग्णालयाच्या स्किन बँकेतून त्वचा मागवून तिचे रोपण करण्यात आले. आज नयनाची प्रकृती उत्तम आहे. मात्र अजूनही आपल्या समाजात त्वचादानाचे महत्त्व जनमानसात फारसे न रुजल्यामुळे अनेक ‘नयनां’वर जीवही गमाविण्याची वेळ येते. शीव रुग्णालयातील ‘स्किन बँक’ भाजून जखमी झालेल्या रुग्णांसाठी आज वरदान बनली आहे.
आपली त्वचा बँक
पुराणातील कथेत अन्नदानापासून ते अवयव दानापर्यंतच्या अनेक कथा आहेत. शिबी राजाने कबुतराला वाचविण्यासाठी आपल्या मांडीचे मांस दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने भारतात नेत्रदान, अवयवदान तसेच त्वचादानाबाबत आजही उदासीनता असल्यामुळे लाखो गरजू रुग्णांना खऱ्या अर्थाने चांगले आरोग्य मिळू शकत नाही. या पाश्र्वभूमीवर शीव रुग्णालयात २००० साली शल्यचिकित्सा विभागाच्या तत्कालीन प्रमुख डॉ. माधुरी गोरे यांनी ‘त्वचादान बँक’ सुरू केली. २००७ पर्यंत ८२ लोकांनी त्वचादान केले. यात ५४ पुरुष आणि ३४ महिलांचा समावेश होता. अमेरिकेत १९५२ साली त्वचादानाची संकल्पना रुजली. त्यानंतर जवळपास ४० वर्षांनी शीव रुग्णालयात त्वचा बँकेची स्थापना झाली असून आतापर्यंत सुमारे ७०० दात्यांनी त्वचादान केल्याचे विभाग प्रमुख मीना कुमार यांनी सांगितले.
रुग्णालयात वर्षांकाठी होरपळलेले सुमारे ६०० ते ७०० रुग्ण येत असतात, तर सध्या वर्षांकाठी १०० ते २०० लोक त्वचादान करतात. परिणामी अनेक रुग्णांवर त्वचारोपण करणे शक्य होत नाही. रुग्णालयातील बँकेत जमा होणाऱ्या त्वचेचा दोन महिन्यातच वापर होत असल्यामुळे अन्य खाजगी रुग्णालयातून येणाऱ्या मागणीचा अपवाद वगळता विचार करणे शक्य होत नाही, असेही डॉ. मीना कुमार म्हणाल्या.
त्वचादान प्रक्रिया
सामान्यपणे १६ वर्षांवरील व्यक्तीची (मृतदेहाची) त्वचा आम्ही घेतो. यासाठी आमच्याकडे कायमची टीम असून या त्वचेची तसेच संबंधित व्यक्तीच्या रक्ताच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्यानंतरच ही त्वचा रुग्णासाठी वापरली जाते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासात त्वचा काढणे जास्त चांगले असते. तथापि आधुनिक तंत्रामुळे चोवीस तासापर्यंत त्वचा काढता येते. भाजलेल्या रुग्णाला त्वचा रोपण केल्यास त्यातही प्रामुख्याने खोल जखमा झालेल्या रुग्णावर रोपण केल्यास जंतुसंसर्ग रोखण्यास मदत होते.
जखमा लवकर बऱ्या होण्यासह अनेक प्रकारे रु ग्णाला साहाय्य मिळते. दुर्दैवाने त्वचादान व अवयव दानाच्या प्रसारात भारत आजही खूप मागे असून याबाबत व्यापक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. नेत्रदानासाठी आजही आपल्याला श्रीलंकेसारख्या छोटय़ा देशावर अवलंबून राहावे लागते, असेही डॉ. सुपे म्हणाले. बहुतेक वेळा त्वचादानाची प्रक्रिया रुग्णाच्या घरी जाऊन करावी लागते. यासाठी आमच्याकडे टीम असून डॉ. अनुराधा डे, डॉ. राजीव, डॉ. मनोज अहिर तसेच मायक्रोबायोलॉजी विभागातील सर्व डॉक्टरांची मदत होते, असे डॉ. मीना कुमार यांनी सांगितले.
‘संडे फ्रेण्डस’ या संस्थेचे त्वचादानातील काम अत्यंत मोलाचे असून प्रामुख्याने गुजराती व जैन समाजातील लोक त्वचादान करताना दिसतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर मांडी व पाठीवरची त्वचा काढली जाते. १६ वर्षांवरील व्यक्तीची त्वचा काढता येते. पायाच्या भागाची त्वचाही काढता येते. या त्वचेवर आवश्यक ती प्रक्रिया करून ती ‘स्किन बँके’त जतन करून ठेवली जाते. चार ते पाच वर्षांपर्यंत त्वचा टिकू शकते. त्वचेचे जतन करून भाजलेल्या रुग्णाच्या शरीरावर रोपण करता येते. यामुळे ‘तुमचा शेवट कोणाच्यातरी आयुष्याची सुरुवात होऊ शकते’ हे ‘संडे फ्रेण्डस’चे घोषवाक्य आहे. ही संस्था गेली तीस वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक काम करीत असून अन्नदान, शिक्षण, औषध वाटप यांसह त्वचादानाच्या कार्यक्रमाला वाहून घेतले आहे.