‘साहेब आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा’; रोहित पवारांचे शरद पवारांना भावनिक आवाहन

शरद पवारांबद्दल वक्तव्ये करताना त्यांच्याबाबतचे मत शेवटचे असू द्या अन्यथा तुमची बेडकासारखी अवस्था होईल असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला आहे.

रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे काल (सोमवार) स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या निर्णयाचा आदर असला तरी त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं माझ्यासह आपल्या असंख्या कार्यकर्त्यांचं मत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. सविस्तर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी शरद पवारांना हे भावनिक आवाहन केले आहे.

तसेच शरद पवार यांच्या माघार घेण्यावरुन त्यांच्यावर टीकेचा भडिमार करणाऱ्यांनाही रोहित यांनी सुनावले आहे. शरद पवारांबद्दल वक्तव्ये करताना त्यांच्याबाबतचे मत शेवटचे असू द्या अन्यथा तुमची बेडकासारखी अवस्था होईल असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला आहे.

रोहित पवार म्हणाले, एक कार्यकर्ता म्हणून, “साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. म्हणून माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा. बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसंही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल.”

राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करीत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे, पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली ५२ वर्षे फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हीच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते, असे सर्वसामान्य माणसाचे मत आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माच राजकारण न करता, गेली ५२ वर्षे न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच त्यांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं, असंही रोहित यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sir reconsider your decision rohit pawars emotional appeal to sharad pawar