मुंबईमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असून त्याचा करोना वाढीच्या दरावर परिणाम होत आहे. पुन्हा एकदा करोना वाढीचा दर ०.१ टक्क्याने वाढून ०.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील ४१५ व्यक्तींना शुक्रवारी करोनाची बाधा झाली, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण तीन लाख ११ हजार ०१२ जणांना करोनाची लागण झाली असून ११ हजार ३८२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्क्य़ांवर स्थिर आहे. आतापर्यंत दोन लाख ९३ हजार ११८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा काळ तब्बल सरासरी ५५० दिवसांवर पोहोचला आहे, तर आतापर्यंत एकू ण २८ लाख ७९ हजार ८३५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी २६२८ जण नवे बाधित आढळले असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या २० लाख ३८ हजार ६३० इतकी झाली आहे, तर आतापर्यंत ५१ हजार २५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : देशात १६ जानेवारीपासून कोविड- १९ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून भारतात सर्वात वेगाने लसीकरण सुरू असल्याचे उघड झाले आहे. केवळ २१ दिवसांमध्ये ५० लाखांहून अधिक जणांना लस टोचण्यात आली आहे. अमेरिकेने २४ दिवसांत, ब्रिटनने ४३ दिवसांत, तर इस्राएलने ४५ दिवसांत हे उद्दिष्ट गाठले आहे.