ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ३० ऑगस्ट रोजी, त्यांचे पथक कासारवडवली येथील बाजारपेठेत कारवाई करत असताना एका फेरीवाल्याकडून धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं तुटली तर, त्यांच्या सुरक्षा रक्षकाचे देखील एक बोट तुटले होते. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. कल्पिता पिंपळे यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. तर, आज त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यावेळी त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता, त्यांनी ”मी अनधिकृत बांधकामांवर करत असलेल्या कारवाईला ब्रेक लागावा, म्हणूनच माझ्यावर हल्ला केला गेला आहे. फेरीवाला एवढा आक्रमक कधीच होत नाही. या हल्ल्यामागे फेरीवाला वाटत नाही.”, असं मोठं विधान केलं आहे.

रूग्णालयामधून बाहेर पडताना माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिये कल्पिता पिंपळे म्हणाल्या, “ सर्वांचे आभार मानताना मी हे सांगू इच्छिते की माझी दोन बोटं गेली, पण मी जेव्हा कारवाई करायला गेली होती. ती कारवाई फेरीवाल्यांवरची कारवाई होती, म्हणून दोन बोटं गेली. अशाप्रकारचे जे एक कुठंतरी चित्र तयार केलं गेलं आहे, त्यावर मला बोलायचं आहे की, आमच्या ज्या बदल्या झाल्या आणि आम्ही अनधिकृत बांधकामं तोडायला सुरुवात केली. आपल्याला माहितीच आहे की मी आल्यानंतर अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू केली. त्यानंतर अनधिृत धाब्यांवर कारवाई सुरू केली आणि त्यानंतर मी फेरीवाल्यांवरील कारवाई सुरू केली, हे माध्यमांना देखील माहिती आहे. फेरीवाल्यांना जर त्यांचा निषेध नोंदवायचा असता, तर जेव्हा ही घटना घडली. तत्काळ प्रतिक्रिया त्यांनी दिली असती. माझ्या कर्मचाऱ्यांवर त्यांन हल्ला केला असता. सगळी कारवाई होऊन गेली. त्यानंतर मी जेव्हा तिथे गेले. माझ्या गाडीतून उतरले. चार-पाच मिनिटांनी हा हल्ला मागून झाला. यामागे मला फेरीवाला हे वाटत नाही. हे जे आम्ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहोत. ही कारवाई कुठंतरी थांबावी हे त्यांना कुठंतरी वाटत असणार, त्यामुळेच त्यांनी हा हल्ला घडवून आणला, असं मला म्हणायचं आहे.”

सूड भावनेने केलेले हे कृत्य आहे –

तसेच, “मुख्यमंत्री मला म्हणाले की, तुम्हाला न्याय मिळेल. मला माहिती आहे की मुख्यमंत्री मला नक्कीच न्याय देतील. हे स्फुल्लिंग कुठंही विझायला नको, आम्ही कारवाई करू, कारवाई करण्यासाठीच आम्ही आहोत. ते आमचं कर्तव्यंच आहे. पण मला एकच म्हणायचं आहे. आज माझं वैयक्तिक नुकसान झालं आहे, माझी दोन बोटं गेली ठीक आहे पण यामध्ये जर मी माझा जीव गमावला असता, तर माझा मुलगा अनाथ झाला असता. माझ्या भावना बहीण मिळाली असती का? माझ्या आईला मुलगी मिळाली असती? याचा का नाही कुणी विचार करत. त्यामुळे फेरीवाल्याचं रूप देऊन…कृपा करून मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की हे फेरीवाल्याचं रूप नाही. जी कारवाई करते आहे त्या कारवाईसाठी केलेला विरोध आहे. त्यामुळे सूड भावनेने केलेले हे कृत्य आहे. पण याला मी घाबरत नाही, आम्ही आणखी जोमाने येऊ आणि आम्ही आमचं काम करू.” असंही कल्पिता पिंपळे म्हणाल्या.

याचबरोबर “फेरीवाल्यांवरील कारवाई ही नवीन नाही. माझं या क्षेत्रातलं हे अकरावं वर्ष आहे. आम्ही फेरीवाल्यावंर नेहमीच कारवाई करतो. फेरीवाला अजिबात एवढा आक्रमक होत नाही. यामागं वेगळंच आहे, की जे अनधिकृत बांधकामावर कारवाई करतो. त्याला कुठतरी ब्रेक लागावा, असं त्यांना वाटत होतं. त्यातूनच घडून आणलेलं हे कृत्य आहे. परंतु मी आता पुन्हा कामावर रूजू झाले की कारवाई सुरू करीन.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

या सर्वांमुळे देखील मी हा आघात सहन करायला आज सक्षम आहे –

“अगदी पहिल्या दिवसापासून अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील माझी विचारपूस केली आहे. तसेच, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दोनवेळा येऊन माझी विचारपूस केली आहे. याशिवाय, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह आमदार व अन्य मंत्र्यांनी देखील माझी भेट घेऊन विचारपूस केली आहे. या काळाता माझ्या कुटुंबाला सर्वांकडून मोलाचा पाठींबा मिळाला, त्यामुळे माझं कुटुंबं हे दुःख सहन करायला सक्षम झालं. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते. तसेच, माझा टीएमसीचा जो परिवार आहे, म्हणजे आमचे महापौर, मनपा आयुक्त, सर्व नगरसेवक, नगरसेविका या सर्वांनी देखील जो येऊन पाठींबा दिला, पहिल्या दिवसापासून हे सर्वजण माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी बरी होऊ शकले, त्याबद्दल मी या सर्वांचे देखील आभार व्यक्त करते. याचबरोबर माझ्यावर उपाचर करणारे डॉक्टर्स व रूग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे देखील मी आभार मानते. त्यांनी मी बरी व्हावे यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळेच माझ्या प्रकृतीत आणखी सुधारणा होईल. याशिवाय माझे समाजबांधव देखील माझ्या पाठीशी उभे राहिले. सर्वात महत्वाचं म्हणजे मी ज्या केडरमधून आहे, त्या केडरचे आमचे अध्यक्ष व माझे सर्व सहकारी यांचा देखील मला पाठींबा मिळाला. या सर्वांमुळे देखील मी हा आघात सहन करायला आज सक्षम आहे म्हणून मी त्यांचे देखील आभार व्यक्त करते. सर्वात महत्वाचं म्हणजे माध्यमांनी जो एक चांगला पाठींबा दिलेला आहे, त्यामुळे मी माध्यमांचे देखील आभार मानते.” असं म्हणत सुरूवातीलाच त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले होते.