दिल्लीतील आम आदमी पक्षात झालेल्या राडय़ाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. ‘आप’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे नेते योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली, त्याचा निषेध करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यातील आपचे बहुसंख्य कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मेधा पाटकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या चौकडीवर टीका केली. पक्षात जो काही तमाशा झाला, यादव व भूषण यांना अपमानास्पद वागणूक दिली, त्यामुळे आपण दु:खी झालो आहोत, असे सांगून त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.  मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लढण्याची तयारी आपने सुरू केली होती. परंतु राष्ट्रीय स्तरावर पक्षात पडलेल्या फुटीचे राज्यातही पडसाद उमटले आहेत.
महाराष्ट्रातील प्रामुख्याने समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते आपच्या बाजूने उभे राहिले. त्यांना केजरीवाल यांच्यापेक्षा पुरोगामी चेहरा असलेले योगेंद्र यादव जवळचे वाटतात. ताज्या घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातही आपमध्ये फूट अटळ मानली जात असून बहुतांश कार्यकर्ते यादव यांच्याच बाजूने उभे राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social activist medha patkar resigns from aap calls party a tamasha
First published on: 29-03-2015 at 04:59 IST