|| अनिश पाटील

वर्षभरात ५५ हजार संदेश; धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई : प्रक्षोभक, मनात भय निर्माण होईल असा मजकूर; धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारे समाजमाध्यमांवरील ४५ हजार संदेश वर्षभरात मुंबई पोलिसांना सापडले आहेत. राज्य सायबर विभागाच्या तपासणीतही विविध समाजमाध्यमांवर १० हजार आक्षेपार्ह संदेश सापडले. याप्रकरणी आतापर्यंत राज्यात ७५, तर मुंबईत १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना समाजमाध्यमांवरही लक्ष ठेवून प्रक्षोभक मजकुराबाबत सतर्क राहावे लागत आहे. ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ पर्यंत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या सोशल मीडिया लॅबने २६ हजार ७७७ प्रक्षोभक संदेश हटवले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजमाध्यमांवर घालण्यात आलेल्या गस्तीत मुंबई पोलिसांना एकूण ४४ हजार ७५६ आक्षेपार्ह संदेश सापडले. त्यातील ४१ हजार ८१ संदेश धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारे होते. १८२० पोस्ट चिथावणीखोर, दहशतवादाशी संबंधित होते. याशिवाय करोनाबाबत चुकीची माहिती पसरवणारे १८५५ संदेश होते.

राज्य सायबर विभागानेही १० हजार ७६ आक्षेपार्ह संदेश शोधले असून ते हटवण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यातील ४,९७७ संदेश काढून टाकण्यात आले. त्यातील सर्वाधिक म्हणजे ७,१४५ संदेश ट्विटरवरील, ९३० संदेश इन्स्टाग्रामवरील, १५९४ संदेश फेसबुकवरील, २७४ यूट्यूबवरील ध्वनिचित्रफिती, १०३ टिकटॉक व १९ इतर ठिकाणचे संदेश आहेत. याबाबत राज्यभरात आतापर्यंत ७५ गुन्हे व २७ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याप्रकरणी ७२ जणांना अटक करण्यात आली असून ६२ आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे.

हटवण्यात आलेल्या संदेशांमध्ये सीएए, एनआरसी कायद्यासंदर्भातील खोटी माहिती, करोनाबाबतच्या खोट्या पोस्ट, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, दहशतवादाचे समर्थन करणारे, धमकावणारे, पोलिसांविरोधात अपप्रचार करणारे संदेश यांचा समावेश आहे. एखाद्या विचारसरणीविरोधात जनमत तयार करण्यासाठी प्रक्षोभक संदेशही पसरवले जात असल्याचे दिसत आहे.

३० पोलिसांचे पथक २४ तास सक्रिय

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर खोटे संदेश पसरवण्याचे प्रमाण अधिक आहे. कायदा व सुव्यवस्थेचा तसेच सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी इंटरनेटवरील संशयित संदेशांवर विशेष लक्ष ठेवले जाते. त्यासाठी ३० पोलिसांचे पथक २४ तास तैनात करण्यात आले आहे.