नवी मुंबईतली एक उच्चभ्रू सोसायटी व तिथले श्वानप्रेमी यांच्यामध्ये सध्या विचित्र वाद सुरू आहे. या श्वानप्रेमीला थेट कोर्टाची नोटिस आल्यावर धक्का बसला व प्रकरणाचे गांभीर्यही. भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या आवारात खायला घालू नये अन्यथा सामाजिक बहिष्कार घालू अशी नोटिस दिल्यानंतर एका वर्षानं सोसायटीनं कोर्टात तक्रार केली. गेल्या महिन्यात कोर्टात हजर राहण्याचं समन्स आल्यावर या श्वावप्रेमीला हे प्रकरण इतकं तापलं असल्याचं कळलं.

मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार सीवूड्स इस्टेट या एनआरआय संकुल म्हणून परिचित असलेल्या सोसायटीनं कविता शाह या सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खायला घालत असल्याची तक्रार केली होती. रहिवाशांच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सोसायटीनं म्हटलं होतं.
सीवूड्स इस्टेटमध्ये भटक्या कुत्र्यांच्या होणाऱ्या हल्ल्यांचा विचार करून कोर्टानं हस्तक्षेप करावा अशी मागणी सोसायटीनं केली आहे. रेसिडेंट्स रूल हँडबुकनुसार – जे एप्रिल 2017 मध्ये देण्यात आले होते – घरांच्या आजुबाजुला, मुलांच्या खेळण्याच्या जागांजवळ व जिथं रहिवासी चालतात अशा ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालू नये असे नमूद करण्यात आले आहे. रहिवाशांच्या सुरक्षतितेसाठीच हे हँडबुक बनवण्यात आल्याचे सोसायटीनं म्हटलं आहे.

तसेच हा परीसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं. भटक्या कुत्र्यांना अन्न द्यायचं असेल तर त्यासाठी एक जागा ठरवण्यात आली असून तिथंच खायला द्यावं असंही सोसायटीनं सांगितल्याचं नमूद केलं आहे. परंतु शाह यांनी या सगळ्याचा विचार न करता नियम मोडले आणि भटक्या कुत्र्यांना खाणं पिणं देणं सुरूच ठेवलं इतकंच नाही तर त्यांच्या ड्रायवहरनं सीसीटिव्ही यंत्रणा नादुरूस्त केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिक जे चालायला जातात, लहान मुलं जी परिसरात खेळत असतात, त्यांना या भटक्या कुत्र्यांपासून धोका असल्याचं सीवूड्स इस्टेटचे जनरल मॅनेजर कर्नल बीआर दास यांनी सांगितलं. तर माझ्याप्रमाणे सुमारे वीसेक जण भटक्या कुत्र्यांना खायला घालतात, मग मलाच एकटीला नोटिस का असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केल्याचे मुंबई मिररनं म्हटलं आहे.

आपल्याला कोर्टाचं समन्स मिळेपर्यंत अशा तक्रारीची कल्पनाच नव्हती असंही त्या म्हणाल्या. 15 हजार रुपयांचा बाँड दिल्यानंतर कोर्टानं 28 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे.