घरातच करोना चाचणी करण्याचा दावा; केंद्रीय औषध नियंत्रण विभागाच्या मनाईनंतर माघार
शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई: करोनाच्या नावाखाली सॅनिटायजर, मास्क यांचा काळाबाजार सुरू असताना चाचण्यांच्या नावाखाली लुबाडण्यासाठीही काही कंपन्या सरसावल्या आहेत. घरातच करोनाची चाचणी करता येईल अशी जाहिरात करत करोनाच्या अण्टीबॉडी चाचण्यांच्या होम स्क्रिनिंग किटची विक्री करण्यासाठी काही कंपन्या सरसावल्या आहेत. मात्र अशा चाचण्यांना कोणतीही परवानगी न दिल्याचे केंद्रीय औषध नियंत्रण विभागाने (डीसीजीआय) स्पष्ट केल्यामुळे या कंपन्यांनी तात्पुरती माघार घेतली आहे. मात्र दिशाभूल करणाऱ्या या कं पन्यांवर ‘डीसीजीआय’ने कारवाई का के ली नाही, असा प्रश्न आहे.
देशात जलदगतीने करोनाची चाचणी करण्यासाठी अण्टीबॉडी चाचण्यांना केंद्रीय आरोग्य विभागाने परवानगी दिली. यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) काही कंपन्यांच्या चाचणी किटलाही परवानगी दिली. मात्र यातून नफा कमाविण्यासाठी काही कंपन्यांनी वेगळीच शक्कल लढविली आहे.
‘आयसीएमआर’ने परवानगी दिलेल्या कंपन्यांचे किट खरेदी करून ते ऑनलाइन विक्री करण्याची तयारी एका कंपनीने सुरू केली. यासाठी ऑनलाइन प्री-बुकिंगही कंपनीने सुरू केले. गर्भवती असल्याची खात्री करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या चाचण्यांप्रमाणे घरीच ही चाचणी कशी करावी याची चित्रफीतही कंपनीने जाहीर केली. कंपनीच्या या जाहिरातीवर ‘ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटर्वक’ने आक्षेप घेत डीसीजीआयला याबाबत लक्ष घालण्याचे पत्राद्वारे कळविले. सर्वसाधारणपणे अण्टीबॉडी चाचणी किट हे ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मात्र या कंपनीने २५०० रुपये किमतीला विकण्याचे जाहीर केले आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय चाचणी न करण्याच्या ‘आयसीएमआर’च्या सूचना असतानाही घरी चाचण्या करण्यासाठी किट विक्री करण्याची परवानगी कशी दिली गेली, असा प्रश्न या संघटनेने पत्रातून उपस्थित केला.
याची दखल घेत अखेर ‘डीसीजीआय’ने या कंपनीला किट विक्रीसाठी परवानगी न दिल्याचे जाहीर करत आयसीएमआरच्या सूचनेनुसार अण्टीबॉडी चाचण्या केल्या जातील असेही डीसीजीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावरील हे उत्पादन सोमवारी मागे घेतले असून प्री-बुकिंगही रद्द केले आहे. बायोनप्रमाणे राज्यातील काही औषध कंपन्यांनी आयसीएमआरने प्रमाणित केलेल्या कंपन्यांकडून किट आयात केली आहेत. त्याच्या विक्रीचीही तयारी केल्याचे समजते.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार बदल
अशा प्रकारे घरातल्या घरात चाचणी करणारे किट विकण्याची जाहिरात करणाऱ्या बायोन या कंपनीने ‘डीसीजीआय’च्या आदेशांनंतर माघार घेतली आहे. ‘कंपनीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली होती. परंतु अण्टीबॉडी चाचण्यांसंबधी मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच जाहीर झाली आहेत. त्यानुसार आवश्यक ती पूर्तता करून काही आठवडय़ांमध्ये किट विक्रीस आणू,’ असे या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
