दहीहंडी उत्सवाच्या व्यावसायिकीकरणातून गोविंदा पथकांमध्ये थरावर थर रचण्यासाठी लागलेल्या चुरशीला उच्च न्यायालयाने लगाम घातल्यामुळे उत्सवाचे दुकान बंद होईल या भीतीने कावरेबावरे झालेल्या काही राजकीय नेत्यांनी या सर्व प्रकरणाला धार्मिक रंग देण्यास सुरुवात केली असून ‘आज यांनी दहीहंडी बंदी केली.. उद्या गणेशोत्सव बंद करतील’, अशा स्वरूपाच्या चिथावणीखोर फलकबाजीला गेल्या दोन दिवसांपासून ठाणे-कळव्यात अक्षरश: ऊत आल्याचे चित्र दिसू लागले आहे. कळवा आणि खारीगाव परिसरांतील समस्त रहिवाशांचे नाव पुढे करून उभारण्यात आलेल्या या फलकांवर ‘जीतेंद्र आव्हाड आम्ही तुमच्यासोबत आहोत’, असा जाणीवपूर्वक उल्लेख करण्यात आल्याने हे फलक नेमके कुणी उभारले याविषयी मात्र फारसे औत्सुक्य नाही.
ठाणे-मुंबईतील लाखोंच्या हंडय़ा फोडण्यासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा, स्पीकरच्या भिंती, तरुण-तरुणींचे बीभत्स नृत्य, उत्सवाच्या ठिकाणी होणारे तंबाखूचे मुक्त वाटप यामुळे दहीहंडी उत्सवातील पारंपरिकता केव्हाच लयास गेली आहे. या उत्सवात होणाऱ्या ढणढणाटाला आवर घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी यंदा कंबर कसल्यामुळे उत्सवाचे आयोजक हवालदिल असतानाच न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशामुळे आपले उत्सवी दुकान बंद होण्याच्या भीतीने अनेकांना घाम फुटला आहे.
१२ ऐवजी १८ वर्षांवरील गोविंदांच्या सहभागासह २० फुटांवर थर रचण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. या निर्णयाचे स्वागत करत अनेक आयोजकांनी यंदा दिखाऊ झगमगाटाला आवर घालण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी मात्र त्याविरोधात लढा देण्याच्या बाता मारत या  प्रकरणाला आता धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला. न्यायलयीन निर्णयानंतर कळवा-खारीगाव पट्टय़ात ‘यांनी दहीहंडी बंद केली.. उद्या गणेशोत्सव बंद करतील.. परवा नवरात्रोत्सव बंद करतील’, असा प्रचार या फलकांद्वारे केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनभिज्ञता आणि व्हॉटस् अ‍ॅप संदेश
कळवा-खारीगाव पट्टय़ात लागलेल्या चिथावणीखोर फलकासंबंधी ठाणे महापालिकेचे उपायुक्त के. डी. निपुर्ते यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याविषयी आपणास काहीही माहिती नसल्याचे सांगितले. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास लागूनच असलेल्या ठाणे महापालिकेच्या अधिकृत थांब्यावर हे फलक लागले आहेत. काही ठिकाणी हे फलक बेकायदा पद्धतीने उभारण्यात आले आहेत. असे असताना यासंबंधी माहिती घेऊन बोलेन, असे वक्तव्य निपुर्ते यांनी केले. व्हॅटस् अ‍ॅपवरूनही चिथावणीखोर संदेश फिरू लागले असून काही संदेशांमध्ये शिवसेनेवर टीका केली जात आहे. ‘शिवसेना आता गप्प का’, असा सवाल करत जीतेंद्र आव्हाड हिंदूूंच्या पवित्र उत्सवासाठी आपले मंत्रिपद पणाला लावत असल्याचा उल्लेखही केला जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some political leaders give religious color to dahi handi ban descion
First published on: 14-08-2014 at 03:38 IST