लोकलमुळे दोन्ही हात गमवावे लागलेल्या मोनिका मोरे हिला विशेष मदत म्हणून पाच लाख रुपये देण्याची घोषणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी मुंबईत केली. याबरोबरच मुंबईतील ज्या स्थानकांवर लोकलचे डबे आणि प्लॅटफॉर्म यातील अंतर जास्त आहे, तिथे प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल आणि पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण करण्यात येईल, अशीही घोषणा खरगे यांनी केली. एकूण ७४ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई-कोल्हापूर आणि बंगळुरू-कोल्हापूर या मार्गांवर नवी गाडी सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्याचबरोबर सांगलीकडे जाणाऱया सर्व गाड्यांना किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामध्येही लक्ष घालण्याचे आश्वासन खरगे यांनी दिले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षांत शिकणारी मोनिका कुर्ला येथील नेहरूनगर भागात राहते. गेल्या शनिवारी दुपारी ती महाविद्यालयातून घरी परतण्यास निघाली होती. घाटकोपर रेल्वे स्थानकात ती गाडी पकडण्यासाठी फलाटावर आली. मात्र, त्याच वेळी गाडी सुरू झाली. गाडी पकडण्यासाठी ती फलाटावरून धावली पण गाडी पकडता न आल्याने मोनिकाचा तोल जाऊन ती रेल्वेरुळांवर पडली. गाडीचे चाक हातावरून गेल्याने तिचे दोन्ही हात कापले गेले. ही घटना घडल्यानंतर प्लॅटफॉर्मची उंची आणि लोकलचे डबे यातील अंतराचा विषय चर्चेत आला आणि उंची वाढविण्याच्या मागणीने जोर धरला. त्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी ही घोषणा केली.