गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडय़ा सुरू करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली. नुकतीच एसटी सोडण्याची मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणसाठी धावतील. विलगीकरणाच्या अटीमुळे आधीच मोठय़ा संख्येने गणेशभक्त कोकणासाठी रवाना झाल्याने विशेष रेल्वेचा कितपत फायदा, असाही प्रश्न आहे. रेल्वे गाडीने प्रवास केला तरीही विलगीकरण आणि करोना चाचणीच्या अटी पाळाव्याच लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारने मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात कोकणसाठी विशेष रेल्वे गाडय़ांचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे मागणीनुसार गाडय़ा सोडतानाच आरक्षित तिकीट हा ई-पास म्हणून ग्राह्य़ धरला जाईल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान शारीरिक अंतर राखणे, सॅनिटाइज करणे बंधनकारक असणार आहे.

यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ‘आम्ही लवकरच माहिती देऊ’, अशी प्रतिक्रिया दिली.

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी रेल्वेकडून नियमित गाडय़ा सोडतानाच विशेष रेल्वे गाडय़ांचेही नियोजन के ले जाते. यंदा टाळेबंदीमुळे कोकणसाठी गाडय़ा सुटणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला. श्रमिक गाडय़ा सोडल्या, त्यामुळे गणेशोत्सवासाठीही गाडय़ा सोडण्याचीही मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

खासगी वाहनांचा आधार..

* २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या अटीमुळे गेल्या आठवडय़ापासून खासगी वाहनांनी अनेकांनी कोकण गाठले. त्यापाठोपाठ नुकतीच एसटी सोडण्याचीही घोषणा करण्यात आली.

* मात्र १२ ऑगस्टपूर्वी पोहोचल्यास दहा दिवसांचे विलगीकरणाची अट शासनाकडून घालण्यात आली आहे आणि त्यानंतर गावी जायचे असल्यास ४८ तासांपूर्वी करोनाची चाचणी करणे बंधनकारक केले आहे.

* सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. मात्र या गाडय़ांमधून राज्यांतर्गत प्रवासाची मुभा नाही. प्रवासी राज्याबाहेरच जाऊ शकतो किंवा अन्य राज्यांतून महाराष्ट्रातील स्थानकात उतरू शकतो. त्यामुळे सध्या कोकणामार्गे धावत असलेल्या विशेष गाडय़ांमधून कोकणातील गणेशभक्तांना प्रवासाची मुभा दिल्यास त्याप्रमाणेही नियोजन करावे लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special trains for konkan on the occasion of ganeshotsav abn
First published on: 08-08-2020 at 00:31 IST