शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निश्चित करण्यात आलेल्या क्रीडा विद्यापीठाचे आरक्षण हटवून शिवसेनेच्याच नगरसेवकांनी तो खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. घोडबंदर मार्गावरील या भल्यामोठय़ा भूखंडावर खासगी विकासकाच्या माध्यमातून सिटी पार्क उभारणीचा प्रकल्प आखण्यात येत असून, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आरक्षण बदलाचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
घोडबंदर मार्गावर कोलशेत परिसरात सुमारे ७३ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर शिवसेनाप्रमुखांच्या नावे क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी शिवसेनेने मंजूर करून घेतला होता. ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ानुसार उद्यानासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडाचे आरक्षण बदलून तेथे शिवसेनाप्रमुखांच्या नावे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. अडीच वर्षे उलटूनही सरकारकडून या आरक्षण बदलास मंजुरी मिळत नसल्याचे पाहून सत्ताधारी शिवसेनेने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून एक नवी शक्कल शोधून काढली आहे. एकूण ७३ हजार चौरस मीटरच्या भूखंडाचे ३० टक्के क्षेत्र खासगी विकासकास द्यायचे आणि त्यावर व्यावसायिक वापर अनुज्ञेय करायचा, असा प्रस्ताव प्रशासनाने आखला आहे. विकास नियंत्रण नियमावलीनुसार सिटी पार्ककरिता आरक्षित भूखंडावर ०.१५ इतके एफएसआय वापरता येते. महापालिकेने आखलेल्या धोरणानुसार यापैकी जो ३० टक्के आकाराचा भूखंड विकासकास दिला जाईल, त्यावर त्याला एकूण भूखंडाचा ९० टक्के एफएसआय देण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच ३० टक्के आकाराचा भूखंड आणि अनुज्ञेय असल्यापैकी ९० टक्के एफएसआय विकासकाच्या पदरात पडणार आहे. या बदल्यात त्याने सिटी पार्क उभारून द्यावे, असा प्रस्ताव महापालिकेच्या नगर अभियंता विभागाने तयार केला असून,  शिवसेनेने त्यास मान्यताही दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरीही आर्थिक सुसह्य़ता तपासणार..
ठाणे महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर वापर बदल अनुज्ञेय नाही. या प्रस्तावात विकासकास भूखंडासह एफएसआय मिळणार असला, तरीही वापर बदल शक्य नसल्याने हा प्रस्ताव आर्थिकदृष्टय़ा सुसह्य़ होईल का, याची तपासणी करण्यासाठी आता क्रिसिल संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नावे उभ्या राहणाऱ्या क्रीडा विद्यापीठाचे आरक्षण बदलताना खरे तर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, हा प्रस्ताव घाईघाईत मंजूर करण्यात आला.
सिटी पार्कला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात येणार असून, क्रीडा विद्यापीठ बोरिवडे येथील सेक्टर ६ येथील मैदानासाठी आरक्षित भूखंडावर उभारले जाईल. खासगी विकासकाचे कोणतेही आर्थिक हित हा प्रस्ताव तयार करताना पाहण्यात आलेले नाही. किंबहुना वापर बदल अनुज्ञेय नसल्यामुळे विकासकास सिटी पार्क उभारणे परवडेल का, हा मूळ प्रश्न आहे. केवळ नागरिकांना चांगले उद्यान मिळावे, असा यामागील उद्देश आहे.
नरेश म्हस्के, पालिका सभागृह नेते

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports university land given to developers
First published on: 19-04-2014 at 05:06 IST