भारतीय न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असून, स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून नक्की बाहेर पडेन, असा विश्वास क्रिकेटपटू अंकित चव्हाण याने व्यक्त केला. अंकित चव्हाण याची मंगळवारी जामीनावर मुक्तता करण्यात आली. मुंबईत परतल्यावर अंकितने पत्रकार परिषदेत स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवर स्वतःचे मत मांडले. लहानपणापासून मी क्रिकेट खेळतोय. क्रिकेटवर माझे प्रेम असून, मला परत क्रिकेट खेळण्यासाठी परतायचे आहे, असेही अंकित चव्हाण म्हणाला.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱया अंकित चव्हाणवर स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे त्याला १६ मे रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली. अंकित चव्हाण याच्यासह याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपी क्रिकेटपटूंवर मोक्कानुसारही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.