कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक असलेल्या लखनभय्याच्या बनावट चकमकीप्रकरणी प्रदीप शर्मा यांच्याविरोधातील खटल्यात केलेली ‘फितुरी’ न्यायालयीन कर्मचारी गीतांजली दातार यांना महागात पडली. विभागीय चौकशीत दोषी ठरलेल्या दातार यांना सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांच्या दाव्यानुसार प्रदीप शर्मा यांनी चकमकीच्या दिवशी दातार यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे त्यांना साक्षीदार बनविण्यात येऊन त्यांचा जबाब नोंदविण्यात आला होता; परंतु न्यायालयात साक्ष देताना  दातार यांनी संबंधित दूरध्वनी क्रमांक ओळखण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना ‘फितूर’ घोषित करण्यात आले. खटल्यातील विशेष सरकारी वकील विद्या कासले यांनी उच्च न्यायालय प्रशासनाकडे या संदर्भात पत्रव्यवहार करून या दातार यांनी आरोपीला मदत म्हणून साक्ष फिरवल्याचे कळवले होते. त्याची दखल घेत उच्च न्यायालय प्रशासनाने दातार यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.