निशांत सरवणकर लोकसत्ता

मुंबई : मुंबईच्या समुद्रकिनारी असलेले कोळीवाडे तसेच शहरात विविध ठिकाणी पसरलेल्या गावठणांना झोपडपट्टी पुनर्वसनाखाली आणण्याच्या विकासकांच्या प्रयत्नांना पुन्हा खीळ बसली आहे. कोळीवाडे व गावठाणे परिसरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांच्यावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना लादण्याच्या प्रयत्नांना विरोध झाल्यानंतर ते तात्काळ थांबविण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिले आहेत. 

मुंबईत ३४ कोळीवाडे आणि १८९ गावठाणे आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मिळणाऱ्या भरमसाठ चटईक्षेत्रफळापोटी अनेक विकासकांचे लक्ष  कोळीवाडे तसेच गावठणांकडे आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत रहिवाशाला फक्त २६९ चौरस फुटाचे घर मिळू शकते. परंतु विकासकाला मात्र प्राधिकरणाला प्रकल्पबाधितांसाठी अधिकाधिक घरे बांधून देऊन भरमसाठ चटईक्षेत्रफळ मिळविता येते. त्यामुळे भूखंडांची कमतरता असलेल्या मुंबईत विकासकांनी या कोळीवाडे व गावठणांकडे आपला मोर्चा वळविला होता. मात्र त्यास रहिवाशांनी विरोध केला. मूळ रहिवाशांची घरे मोठी असतानाही २६९ चौरस फुटाचे घर कसे घेणार, असा त्यांचा सवाल होता.

असा पहिला प्रयत्न वरळी कोळीवाडय़ात झाला. शीव कोळीवाडय़ाचे अस्तित्व त्याआधीच संपविण्यात आले होते. तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जात आहे. मात्र वरळी येथील साडेतीन एकर परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर करावयाच्या प्रयत्नांना यश आले नाही. याबाबत प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुनावणी प्रलंबित आहे. माजी गृहनिर्माण राज्यमंत्री व शिवसेना नेते सचिन अहिर यांनी कोळीवाडय़ांवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना लादण्याला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी कोळीवाडे-गावठाणे झोपडपट्टी होण्यापासून बचावली आहेत. 

कोळीवाडे-गावठणांचा सीमांकनाचा प्रश्न प्रलंबित आहे. अशावेळी बायोमेट्रीक सर्वेक्षण करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना लादण्यास या रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटेपर्यंत हे सर्वेक्षण सुरु केले जाणार नाही.

– सतीश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण