मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव

मुंबई: शासनाच्या निर्णयानुसार तिसरे अपत्य असलेल्यांना शासकीय नोकरी सामावून घेतले जात नाही. तरीही हा नियम शिथिल करून तिसरे अपत्य असलेल्या मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे पाठविला आहे.

मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक अर्हतेनुसार एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्यात येणार आहे. आतापर्यंत १५ जणांचे अर्ज आले असून १३ पात्र ठरले आहेत. यामध्ये तिसरे अपत्य असलेल्यांनीही अर्ज के ला आहे.

मराठा आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात आली. यासाठी मोर्चेही काढले. आरक्षण मिळावे यासाठी काही आंदोलनकर्त्यांनी आत्महत्याही केली. त्या पाश्र्वाभूमीवर आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटीमध्ये नोकरी देण्याचा निर्णय डिसेंबर २०१८ मध्ये माजी परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता.

महामंडळाने या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या व माहिती मागविली. त्यात ३४ जण असल्याची माहिती महामंडळाला मिळाली आहे. नोकरीसाठी१५ अर्ज आले असून त्यापैकी १३ पात्र ठरल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. सहा जणांना नियुक्तीही देण्यात आली आहे. उर्वरित पात्र ठरलेल्यांसाठी तांत्रिक अडचण उद्वभली. यात पात्र ठरलेल्या एका महिला अर्जदाराला तीन अपत्ये आहेत, तर अन्य एका व्यक्तीचे वय ४१ असून खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळवण्यासाठी ३८ वर्षे वय अशी अट आहे. अन्य काही अर्जांमध्येही असेच मुद्दे उपस्थित झाले आहेत.

शासन निर्णयानुसार २००५ नंतर तिसरे अपत्य असलेल्यांनी शासकीय नोकरीसाठी अर्ज केल्यास त्यांना नोकरीत सामावून घेतले जात नाही. जर तिसरे अपत्य असल्याची माहिती लपविल्यास, आहे ती नोकरीही गमावण्याची वेळ येते. मात्र मराठा आंदोलनातील व्यक्तींना नोकरी देताना हा निर्णय शिथिल करावा आणि तीन अपत्ये असलेल्यांना एसटीत नोकरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या अर्जदारांनाही एसटीत नोकरी मिळावी, यासाठी महामंडळाने शासनाकड प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे, तर वयाची अटही शिथिल करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.

… तर सर्वांनाच नियम लागू

शासनाकडून विशेषाधिकार म्हणून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तरीही तिसऱ्या अपत्याचा नियम एसटीत यापुढे नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वांनाच लागू होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांमध्ये  तिसरे अपत्य असलेल्यांनीही नोकरीसाठी अर्ज के ले आहेत. अशांना एसटीत नोकरी मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

मराठा आंदोलनामुळे सामाजिक दृष्टिकोन ठेवून एसटीत नोकरी देण्याचा निर्णय त्या वेळी घेतला होता. त्यामुळे नियम, अटी व शर्ती शिथिल करून सर्व उमेदवारांना नोकऱ्या द्याव्यात. – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस</strong>