रंगात बदल करण्याचा महामंडळाचा विचार
एसटी म्हटले की डोळ्यासमोर लाल डबा आणि मळकट खाकी रंगाचा चालक असे सर्वसाधारण चित्र उभे राहते. मात्र या प्रतिमेला छेद देत चालक आणि वाहकांचा खाकी गणवेश नव्या रंगात ‘डिझाइन’ करण्याचा विचार एसटी महामंडळाकडून केला जात आहे. याबाबत ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ या संस्थेची मदत घेतली जात आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय घेतला जाणार असून गणवेशाबाबतच्या अपेक्षांसाठी कर्मचाऱ्यांची मतेही विचारात घेतली जाणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या ‘राज्य परिवहन मार्ग महामंडळा’च्या सेवेत सुमारे एक लाख सात हजार चालक-वाहक व कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने ठरवून दिलेला गणवेश परिधान करणे सक्तीचे आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोन संचांसाठी ५ मीटर कापड दिले जाते. याशिवाय गणवेश शिवण्यासाठी सरकारच्या दरानुसार रक्कम दिली जाते. मात्र तरीही गणवेशाचा प्रकार आणि रंग आकर्षक नसल्याने हा नवा प्रयोग केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या रंगाच्या गणवेशासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या मदतीने नवा गणवेश तयार केला जाणार आहे. त्यासाठी या संस्थेकडून कर्मचाऱ्यांच्या गणवेशाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. गणवेशाचे प्रत्येकी दोन पर्याय सुचविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

* एसटीच्या महाव्यवस्थापकांनी गणवेशासंदर्भात सूचना केल्या आहेत.
* कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी प्रत्येक ठिकाणच्या हवामानानुसार कापडाचे स्वरूप नक्की केले जाणार आहे. अपेक्षित खर्च दहा लाख रुपये आहे.
* याबाबत महामंडळाचे अध्यक्ष काही दिवसांत निर्णय घेणार असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.