लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवूनही शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली असून १८ अधिकाऱ्यांना यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच उर्वरित दोषी अधिकाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई सुरू असल्याचा खुलासा गृह विभागाने केला आहे.

लाच प्रकरणात दोषी ठरलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतरही सरकारच्या विविध विभागात ४६ अधिकारी कार्यरत असल्याची बाब ‘लोकसत्ता’ने (२८ फेब्रुवारी) उघडकीस आणली होती. त्यासंदर्भात गृह विभागाच्या सह सचिव चारूशीला तांबेकर यांनी पाठविलेल्या खुलाशात दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फीती कारवाई सुरू असल्याचे म्हटले आहे. लाचप्रकरणात दोषी ठरलेल्या ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी १८ जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विविध  महापालिकांमधील ५ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पारित करण्यात आले. दोन अधिकाऱ्यांची प्रकरणे मान्यतेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आली आहेत. पाच अधिकाऱ्यांच्या प्रकरणांना न्यायालयाची स्थगिती असून चार अधिकारी सेवानिवृत्त झाले. उर्वरित १२ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच गृह विभागाशी सबंधित १२ अधिकारी- कर्मचाऱ्यांपैकी १० जणांना बडतर्फ करण्यात आले असून दोन अधिकारी सेवानिवृत झाल्याचेही या पत्रात म्हटले आहे.