स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची भूमिका

सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन देत भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असतानाच महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा आग्रह राज्यातील सत्तेचा वाटेकरी असलेल्या शिवसेनेने धरला आहे. मात्र, सत्तेसाठी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरण्याच्या राजकीय पक्षांच्या या प्रथेवरच स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बोट ठेवले आहे. कर्जमाफीची ही प्रथा वाईट असून त्यामुळे पतशिस्त घसरणीला लागते, असे आपले निरीक्षण असल्याचे मत भट्टाचार्य यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय उद्योग महासंघातर्फे (सीआयआय) येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भट्टाचार्य यांनी कर्जमाफीच्या मुद्दय़ावर स्पष्ट भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने त्यांची पतशिस्त बिघडते. कारण एकदा कर्जमाफी मिळाली की, शेतकरी पुढच्या कर्जमाफीकडे डोळे लावून बसतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची परतफेड भविष्यातही होत नसतेच. सरकार कर्ज परतफेडीची हमी देत असल्याने बँकांकडे कर्जरक्कम जमा होईल. परंतु आम्ही जेव्हा पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज देऊ त्यावेळी ते कर्जमाफीच्या घोषणेसाठी पुढील निवडणुकांवर लक्ष ठेवून असतील आणि ही साखळी सुरूच राहील’. शेतकऱ्यांना उभारी मिळेल, अशा योजना राबविल्या जायलाच हव्यात, याबद्दल दुमत नाही. मात्र, ज्यामुळे शेतकऱ्यांची पतशिस्त बिघडणार नाही, अशा योजना राबवल्या जाव्यात, असे स्पष्ट मतही भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, असा कोणताही प्रस्ताव स्टेट बँकेकडे आला नसल्याचेही भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका जेव्हा डबघाईला येतात, तेव्हा त्या सरकारकडून भांडवली मदतीची अपेक्षा करतात. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही शेतकऱ्यांसारखीच सरकारी मदतीच्या अपेक्षेवर मदार ठेवू नये आणि आपल्या ताकदीवरच सुधारणा करावी, असे परखड मतही त्यांनी मांडले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने त्यांची पतशिस्त बिघडते. कारण एकदा कर्जमाफी मिळाली की, शेतकरी पुढच्या कर्जमाफीकडे डोळे लावून बसतात.    अरुंधती भट्टाचार्य