राज्य शासनाचा नवीन नियम
मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांमध्ये लिपिक-टंकलेखक पदासाठी या पुढे पदवीधर उमेदवारच पात्र ठरणार आहेत. राज्य शासनाने या संदर्भात वय व शैक्षणिक पात्रतेबाबतचे नवीन सेवाप्रवेश नियम तयार केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.
शासकीय सेवेत लिपिक-टंकलेखक या क संवर्गात मोडणाऱ्या पदासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण आणि मराठी-इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र अशी शैक्षणिक पात्रता ग्राह्य़ धरली जात होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे.
बृहन्मुंबईच्या बाहेरील शासकीय कार्यालयांमध्ये लिपिक-टंकलेखक या पदांसाठी कोणत्याही शाखेची पदवी असणे ही शैक्षणिक पात्रता ग्राह्य़ धरली जाणार आहे. त्याचबरोबर मराठी टंकलेखनातील किमान ३० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजीमधील ४० शब्द प्रतिमिनिट वेगमर्यादा व त्यासंबंधीचे शासन मान्य संस्थेचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही लिपिक-टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्याचीही या नियमांत तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी शासकीय सेवेत ड वर्गात तीन वर्षे नियमित सेवा पूर्ण केली असावी, अशी अट राहणार आहे.
वाहनचालकांचा संवर्ग बदलून त्यांनाही शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असतील तर लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी लिपिक-टंकलेखकपदासाठीही पदवीधर असणे बंधनकारक राहणार आहे. मात्र ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या आधी अनुकंपाच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेचा नवीन नियम लागू होणार नाही, त्यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता कायम असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.