लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला खूश करण्याची गुरुवारी शेवटची संधी आहे. यातूनच लोकानुनय करणारा अर्थसंकल्प सादर करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेत असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
लोकसभा निवडणुकीमुळे चार महिन्यांचे लेखानुदान फेब्रुवारी महिन्यात मांडण्यात आले होते. उद्या उर्वरित आठ महिन्यांसाठीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार सादर करतील. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले. हाच कल विधानसभा निवडणुकीत राहण्याची शक्यता आहे. तरीही सर्वसामान्य मतदारांना खुश करून काही चित्र बदलण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. तसा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता आहे.
२००४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समाजातील दुर्बल घटकांना विविध सवलती देणारा अर्थसंकल्प सादर केला होता. त्याचा फायदाही निवडणुकीत झाला होता. या पाश्र्वभूमीवर यंदाही विविध घटकांना सवलती किंवा मोफतचे गाजर दाखविले जाईल अशी शक्यता आहे.
*‘व्हॅट’ लागू झाल्याने करात फारशा सवलती देण्याचे राज्यांच्या हाती राहिलेले नाही. तरीही दारु, सिगारेटवरील करात वाढ केली जाऊ शकते.
* सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या काही वस्तूंवरील कर कमी करून मतदारांना खूश केले जाईल अशी चिन्हे आहेत.
* शेतकरी वर्गाला सवलती देऊन या वर्गाची सहानभुती मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे.
* धनगर, लिंगायतसह विविध समाज घटकांना कसे खुश करता येईल याचाही प्रयत्न अर्थसंकल्पातून केला जाईल.
irrigation percent?
irrigation percent, irrigation, loksatta news, loksatta, marathi news, marathi