सेवा ठप्प असल्याने रोज केवळ दोन ते तीन टक्केच उत्पन्न

उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई : आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीचे अर्थचक्र करोना टाळेबंदीमुळे गाळात पूर्णपणे रुतले आहे. जिल्ह्य़ाबाहेर प्रवासबंदी असल्याने बहुतांश एसटीसेवा ठप्पच असल्याने सध्या केवळ दोन- तीन टक्के उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही थकले असून, एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी काही महिने लागणार आहेत. तोपर्यंत राज्य सरकारलाच आर्थिक मदत देणे अपरिहार्य आहे.

एसटीमध्ये सुमारे ९८ हजार कर्मचारी असून त्यांचे थकलेले पगार देण्यासाठी शासनाने नुकतेच ५०० कोटी रुपये दिले. पण ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, स्वातंत्र्यसैनिक आदींच्या प्रवासी भाडय़ातील सवलतींपोटी राज्य सरकार एसटीला वार्षिक १८०० कोटी रुपये देते. ही रक्कम शासनाकडून थकीत असल्याने त्यातील काही रक्कम देण्यात आली व नुकतेच दिलेले ५०० कोटी रुपयेही त्यातून वळते केले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार एसटीने परप्रांतीयांना त्यांच्या गावी पोचविण्यात आले. त्यापोटी ९० कोटी रुपये खर्च आला असून त्याचा परतावा शासनाकडून अद्याप आला नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

रोजचे २२ ते २४ कोटी बुडाले

करोना टाळेबंदीमुळे एसटीची सुमारे १६००० नियतने (शेडय़ूल) ठप्प आहेत. त्यामुळे दररोजचे २२-२४ कोटी रुपये उत्पन्न मार्चपासून बुडाले आहे. गेले दीड-दोन महिने मालवाहतुकीतून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न सुरू असला तरी त्याला फारसे यश मिळाले नसून त्यातून दिवसाला सुमारे १० लाख रुपये मिळत आहेत. टाळेबंदी उठविण्यात आली असली तरी  एसटीच्या बाहेरगावच्या सेवा बंदच आहेत. जिल्हांतर्गत सेवेसाठीही ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना प्रवासबंदी, जास्तीतजास्त २२ प्रवासी यासह अनेक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद नसून सध्या दररोज फक्त दीड लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करीत आहेत. पूर्वी ७२-७३ लाख प्रवासी दररोज एसटीने प्रवास करीत होते.

संचित तोटा पाच हजार कोटींवर

गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये नियमित पूर्ण प्रवासी क्षमतेने राज्य परिवहन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र  जिल्हाबंदीमुळे एसटी सेवा अजून ठप्पच आहे.

त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर  परिणाम झाला असून अवघे दोन-तीन टक्के उत्पन्न मिळत असल्याने संचित तोटा पाच हजार कोटी रुपयांवर गेला आहे. इंधनावर वार्षिक तीन हजार कोटी रुपये आणि टायर, देखभाल, दुरुस्तीवर सुमारे ६०० कोटी रुपये खर्च होतात. त्यापैकी काही खर्च करावाच लागणार आहे.

इंधनावरील विक्रीकरापोटी एसटीला सुमारे १२०० कोटी रुपये, प्रवासी करापोटी १३०० कोटी रुपये तर पथकरापोटी १६८ कोटी रुपये खर्च येतो. टाळेबंदीचा फटका बसलेल्या उद्योग व अन्य क्षेत्रांना केंद्र व राज्य सरकारने अनेक सवलती दिल्या. त्या धर्तीवर या करांमध्ये सवलती व आर्थिक मदत मिळाली, तरच एसटीचे थकलेले पगार व कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरची देणी देता येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टाळेबंदीपूर्वी

’ एसटीचे दररोजचे सरासरी – २२- २४ कोटी रुपये

’ प्रवासी संख्या – ६३ लाख

’ वेतन व आनुषंगिक खर्च – दरमहा २७०-३०० कोटी रुपये

टाळेबंदी काळात व सध्याची परिस्थिती

’ दररोजचे सरासरी उत्पन्न – प्रवासी भाडे ४० लाख रुपये व मालवाहतूक १० लाख रुपये, एकूण ५० लाख रुपये

’ दररोजची प्रवासी संख्या – दीड लाख