राज्यातल्या दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सर्व शुल्कांसह संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात नवा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयानुसार प्रात्यक्षिक, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र या खर्चांसह परिक्षा फीचाही समावेश असणार आहे. तसेच प्रतिपूर्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या १८ ऑक्टोबर १९९३च्या परिपत्रकानुसार, दुष्काळ आणि टंचाईग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात येत होती. यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र या खर्चांचा समावेश नव्हता. मात्र, आता नव्या परिपत्रकानुसार, या खर्चांचाही यात समावशे करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांचे परिक्षेचे फॉर्म भरुन घेताना त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेणे, तसेच फॉर्म भरण्यापूर्वी जी गावे दुष्काळी घोषीत करण्यात आली आहेत तेथील विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची काळजी बोर्डाला घ्यायची आहे. फी माफीची ही सवलत सरकारी, खासगी अनुदानीत/ विना अनुदानीत माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे.


या संदर्भातील शासनाच्या निर्णयाची प्रत राज्य सरकारच्या http://www.maharasthra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.