पुढील आठवडय़ात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे.

या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि विजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ  नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

परतीचा प्रवास १० पासून  : परतीच्या पावसाची सुरुवात राजस्थानच्या वायव्येला १० ऑक्टोबरपासून होण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. राजस्थानातील पाऊस सध्या ओसरत असून परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाच्या दीर्घकालीन अनुमानानुसार पुढील आठवडय़ात राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

तापमान दोन अंशांनी वाढले : मुंबईकडे पावसाने पाठ फिरवली असून रविवारी तापमानात दोन अंशांनी वाढ होऊन पारा ३४.५ अंश सेल्सियस इतका वाढला. त्यामुळे दिवसभर उन्हाचा ताप वाढला. उत्तर भारतात हवामानामध्ये वेगाने बदल होत असून शरदाची चाहूल लागली आहे.