scorecardresearch

महाराष्ट्राची शान असलेल्या ‘कोयना’ धरणाची कथा सांगणारा लघुपट व्हायरल

‘कोयना’ धरणाच्या उभारणीची प्रेरणादायी कथा लघुपटात चित्रित करण्यात आली आहे.

Story, Koyna Dam, largest dams, Maharashtra
कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणा-या कोयना धरणाच्या निर्मितीचा एक लघुपट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘कोयना स्टोरी’ नावाचा फिल्म डिव्हिजनची निर्मिती असलेला हा लघुपट दिलीप जामदार यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘एमएच ११ प्रोडक्शन’ या फेसबुक पेजवर लघुपट अपलोड करण्यात आला असून फक्त तीन दिवसात तो सव्वा लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि सात हजार लोकांनी शेअर केला आहे.या लघुपटाची कथा एलिझाबेथ रूपेन यांनी लिहिली असून एस.टी.बेकर्ले हिल यांनी आपल्या वजनदार आवाजात कोयनेची कथा सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे. एका पोवाड्याच्या माध्यमातून कशाप्रकारे कोयनेची पायाभरणी झाली आणि सर्व कामगार व अभियंत्यांनी मिळून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला याची प्रेरणादायी कथा या लघुपटात चित्रित करण्यात आली आहे.

कोयना स्टोरी
कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे. कोयना धरण १९५६ ते १९६२ या काळात वीजनिर्मितीसाठी उभारण्यात आले. या धरणात ९८.७८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची साठवण होऊ शकते. काही वर्षांपूर्वी धरणाच्या दाराची उंची वाढवून मजबुतीकरणानंतर या पाणीसाठ्याची क्षमता १०५.२५ अब्ज घनफूट करण्यात आली आहे. रबल काँक्रीट या प्रकारात बांधण्यात आलेल्या या धरणाची उंची १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त) असून लांबी ८०७.७२ मी आहे. तसंच पाणीसाठ्याची क्षमता २७९७.४ दशलक्ष घनमीटर असून वापरण्यायोग्य क्षमता २६७७.६ दशलक्ष घनमीटर आहे. कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे. वीजनिर्मिती व सिंचन अशा दोन्ही महत्त्वपूर्ण गरजा यशस्वीपणे भागवून राज्याला स्वयंपूर्ण बनविणारा प्रकल्प म्हणून कोयना प्रकल्पाकडे पाहिले जाते.

कोयनेच्या पाण्यावर सौरऊर्जा

चर्चा : तहानलेल्या महाराष्ट्राचे वास्तव

 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-09-2016 at 14:20 IST