मुंबई : न्यू माहीम शाळेच्या संरचनात्मक लेखापरीक्षणात संबंधित शाळेची इमारत अतिधोकादायक असल्याचे नमूद करण्यात आल्याने लवकरच शाळेचे पाडकाम करण्यात येणार आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी न्यू माहीम शाळेची इमारत आहे, त्याच ठिकाणी इमारतीची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या जमिनीचा वापर केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठीच केला जाणार आहे. तसेच, या शालेय इमारतीचे बांधकामही महानगरपालिकेमार्फत केले जाणार आहे. खासगी विकासकामार्फत पुनर्बांधणी केली जाणार नाही अथवा कोणतेही खासगीकरण विचाराधीन नाही, असे महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले.
महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे महानगरपालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले असून त्यात ही इमारत सी १ श्रेणीत म्हणजेच अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे, असे असले तरी पालक तसेच लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे त्रयस्थ सल्लागार संस्थांमार्फत देखील संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले. या संरचनात्मक लेखापरीक्षणातही इमारत ‘अतिधोकादायक’ असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे.
महानगरपालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने देखील ही शालेय इमारत अतिधाेकादायक असल्याबाबतचे आदेश दिले आहेत.महानगरपालिकेची न्यू माहीम शाळा विविध भाषिक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने या शालेय इमारतीतील मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत नियोजनबद्ध स्थलांतरण करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे पर्यायी व्यवस्थेत स्थलांतरण करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. असेही पालिकेने स्पष्ट केले.दरम्यान, माहीम मोरी शालेय इमारत पुनर्बांधणीची कार्यवाही प्रगतिपथावर असून त्याची निविदा प्रकाशित झाली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
