आठवडय़ाची मुलाखत : मिलिंद चिंदरकर (स्ट्रक्चरल इंजिनीअर)

अंतर्गत सजावट करताना काढले गेलेले पिलर (खांब) हे घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत दुर्घटनेमागचे कारण असावे, असा संशय व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी शीवमधील नवरे इमारत, बोरिवलीतील लक्ष्मी छाया या इमारतीदेखील खांब काढून टाकल्याने पडल्या होत्या. या दुर्घटनांमधून पालिकेच्या झापडबंद कारभाराबरोबरच आणखी एक मुद्दा ऐरणीवर येतो आहे तो म्हणजे इमारतीच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ अर्थात संरचना परीक्षणाचा. कोणतीही इमारत अचेतन वस्तू नसून ती जिवंत व्यक्तींना छत्रछाया देणारी वास्तू आहे. म्हणूनच तिचे आयुष्य वाढविण्यासाठी वेळोवेळी तिची तपासणी, दुरुस्ती, रंगसफेदी करणे आवश्यक असते; परंतु ‘वास्तुपुरुष’ म्हणून जे कुणी मालक, गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी असतात ते ही बाब दुर्लक्षित करतात. दुसरीकडे अंतर्गत सजावट करताना इंटेरिअर डिझायनर चुकीचा सल्ला देतात की, ज्यामुळे इमारतीच्या संरचनेला धोका पोहोचू शकतो. इमारतीला दीर्घायुषी करण्याच्या व्यवसायात असलेले स्ट्रक्चरल इंजिनीअर मिलिंद चिंदरकर यांनी नेमक्या याच धोक्यांची जाणीव करून दिली आहे.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
rangpanchami celebration
Health Special: रंगपंचमीला कोणते रंग वापराल? रंगांचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

* अंतर्गत सजावट करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?

अनेकदा घराची अंतर्गत सजावट करताना भिंत स्लॅबवर बांधली किंवा काढून टाकली जाते. भिंत स्लॅबवर ठेवल्याने त्यावर अतिरिक्त भार येतो. भिंतीचे वजन केवळ बीमच घेऊ  शकतात. स्लॅब त्यासाठी नक्कीच डिझाइन केलेली नसते. यामुळे स्लॅबवर अतिरिक्त भार येऊन कालांतराने तो खालच्या बाजूस लोंबकळू लागतो. अनेकदा न्हाणीघराच्या जागा बदलून ते वॉटर प्रूफिंग नसलेल्या ठिकाणी बांधले जाते. त्यामुळे खालच्या मजल्यावरच्या माणसाला गळतीचा त्रास सहन करावा लागतो. इमारतीमध्ये न्हाणीघर, शौचालयाची जागा बदलल्याने कन्सिल्ड पाइप टाकण्यासाठी व वॉटर प्रूफिंगसाठी जमीन वर उचलावी लागते. त्यांचा अतिरिक्त भार स्लॅबवर पडतो. याशिवाय शौचकुपांची जागा बदलणे (यासाठी भिंतीत कोनाडा करून पाइप बसविले जातात), एसीचे पाइप बसविण्यासाठी कोअर कटिंग तंत्राऐवजी स्वस्तातले तंत्र वापरून बीमला भोक पाडले जातात. यामुळे बीममध्ये सूक्ष्म छिद्रे निर्माण होतात. आतले लोखंड उघडे पडते. त्यावरील काँक्रीटचे आवरण निघून जाते व लोखंड गंजण्याची प्रक्रिय जलद गतीने होते. एसी युनिट छज्जावर ठेवल्याने व्हायब्रेटिंग होऊन वॉटर प्रूफिंगला भेगा पडतात व गळती चालू होते. म्हणून एसी भिंतीवरच लावणे आवश्यक आहे. तसेच, भल्या मोठय़ा जाळी खिडकी भोवती लावल्याने त्या गंजतात व गळती चालू होते. फ्रेंच खिडक्यांसाठी खिडकीची उंची व रुंदी मोठी करणे, जमिनीची उंची वाढवून स्लॅबवर अतिरिक्त भार देणे, स्वयंपाकघरातील मोरीची जागा बदलणे, स्लॅब आणि बीममध्ये कोरीवकाम करून विजेच्या तारा कन्सिल करणे, वॉशिंग मशीनसाठी कॉलम, भिंत यांतील काही भाग काढून त्यात पाइप बसविणे, इलेक्ट्रिक चिमणीचा पाइप भिंतीला वा बीमला भोक पाडून टाकणे या अशा कारणांमुळे भेगा, तडे जाऊन इमारतीच्या संरचनेला धोका पोहोचू शकतो. म्हणून घराची अंतर्गत सजावट करताना प्रथम ती योजना स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून मंजुरी घेऊनच अमलात आणणे आवश्यक आहे.

* स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय? व कशासाठी करावे?

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सर्व घरांमधील कॉलम, बीम व स्लॅब बारकाईने बघणे आवश्यक आहे; परंतु बहुतेककरून ते अत्यंत कमी आर्थिक मोबदल्यात केले जाते. इमारतीची संपूर्ण पाहणी न करताच अहवाल दिला जातो. अशा अहवालाचा इमारतीचे वय वाढवण्यासाठी वा डागडुजी करण्यासाठी फारसा उपयोग नसतो. केवळ तो एक कायदेशीर सोपस्कार ठरतो. याला इमारतीतील रहिवासी तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करणारे स्थापत्य विशारदही तितकेच जबाबदार आहेत. अशा प्रकारच्या वरवरच्या तपासणीमुळे इमारतीच्या संरचनेबाबतची सत्य परिस्थिती कळतच नाही. स्ट्रक्चरल ऑडिट करताना इमारत दुरुस्त करायला खर्च किती येईल हेही देणे गरजेचे आहे. पण फारच थोडे स्थापत्य विशारद अहवालासोबत ही माहिती देतात. ते केल्यास इमारची आवश्यक दुरुस्ती कधी व कशी करावी हे कळते व त्यानुसार पावले टाकता येतात. परंतु असा दृष्टिकोन फारच कमी सोसायटय़ांचा असतो.

* इमारतीची दुरुस्ती वेळेवर न होण्याची कारणे काय असतात?

भाडेकरू नसलेली इमारत दुरुस्त करण्यासाठी महापालिकेकडे वेगळे नियमच नाहीत. त्यासाठी पालिका इमारतीचे आराखडे मागते जे फारच थोडय़ा इमारतींकडे असतात. याचाच फायदा पालिकेचे अधिकारी घेतात व नवीन इमारत उभी करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या प्रकारच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी कराव्या लागतात. यासाठी वस्तुविशारद नेमावा लागतो. त्यातच इमारत दुरुस्त करण्यासाठी लागणाऱ्या नियमावलीचा अभाव असल्याने इमारतीला आवश्यक त्या पद्धतीने दुरुस्त करता येत नाही. यामुळे इमारतीकडे दुर्लक्ष होते व भेगा वाढत गेल्याने दुरुस्तीचा खर्च वाढत जातो. बऱ्याचदा इमारतीतील सभासद दुरुस्तीसाठी लागणारा खर्च काढण्यास टाळाटाळ करतात. प्रत्येक सोसायाटीत पाच टक्के सभासद वेळेवर पैसे देत नाहीत असा आमचा अनुभव आहे. या शिवाय जागा कर्ज काढून घेतलेली असते. कर्जाचा हप्ता फेडता फेडता इमारत दुरुस्तीचा खर्च पेलणे कठीण होऊन बसते. दुरुस्तीबाबत ठरावीक सभासदच जागरूक असतात. या सगळ्यामुळे दुरुस्ती रखडते.

*  इमारतीची काळजी कशी घ्याल?

इमारतीचे रंगकाम पाच ते सात वर्षांनी करून घेणे, मलनि:सारण, जलवाहिन्यांमधील गळती थांबवणे, इमारतीच्या भिंतींमध्ये होणारी झाडांची वाढ रोखणे, भेगा पडलेले पिलर, बीम, प्लास्टर दुरुस्त करणे यांसारखे उपाय वेळीच केले गेले तर इमारत साधारण ६० ते ७५ वर्षे नक्कीच टिकू शकते. स्ट्रक्चरल ऑडिट करताना घरात गळती कोठून होते, घरातील पिलर, बीम व छत यामध्ये भेगा आहेत का, घरातील जमिनीच्या टाइल्स वर आल्या आहेत का, हे बघून त्यांचा खर्च काढणे अपेक्षित आहे. घरातील जमिनीच्या टाइल्स वर आल्या असतील व स्लॅब खालच्या बाजूने लोंबकळत (सॅगिंग) असेल तर ते तोडून नवीन काँक्रिट व स्टील टाकणे आवश्यक असते. पण जमीन तुटेल म्हणून अशा छताची थातुरमातुर दुरुस्ती केली जाते. अशा दुरुस्तीचे आयुष्य जेमतेम सहा-सात वर्षांचे असते. त्यानंतर

पुन्हा छतामध्ये भेगा पडायला लागतात. थोडक्यात वास्तूला निर्जीव वस्तूप्रमाणे न वागवता सजीव शरीर म्हणून पाहणे गरजेचे आहे. आपले वय वाढले की, आपण शरीराच्या तपासण्या चालू करतो व आपले आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतो. इमारतीचेदेखील शरीराप्रमाणे असते. यासाठीच इमारतीची वेळोवेळी तपासणी, थोडक्यात- स्ट्रक्चरल ऑडिट- करणे अत्यंत आवश्यक आहे.

रेश्मा शिवडेकर – reshma.murkar@expressindia.com