मुंबईमधील भिंती स्वच्छ आणि सुंदर दिसाव्यात यासाठी पालिकेने आता ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वास्तुशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुट्टीचा दिवस असतानाही शनिवार आणि रविवारी वरळी येथील भिंतींवर आपला कलाआविष्कार साकारून ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. महापौरांनीही या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये केवळ रस्ते स्वच्छ करण्याचे नव्हे, तर मुंबई सुंदर दिसावी यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर जनजागृतीपर संदेश देणारी आकर्षक चित्रे साकारण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. पालिकेच्या जी-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील अ‍ॅनी बेझंट मार्गावरील डॉ. हेडगेवार चौकाजवळील लव्हग्रोव उदंचन केंद्राच्या भिंतीवर दादरच्या रचना संसद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी आणि रविवारी आकर्षक अशी चित्रे रंगविली आहेत. स्वच्छता, पाण्याची बचत आदी विविध संदेश या चित्रांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. जी-दक्षिण विभाग कार्यालयाच्या साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या पुढाकाराने हा कलाआविष्कार साकारण्यात आला.
महापौर स्नेहल आंबेकर यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन ‘स्वच्छ भारत अभियाना’त दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ आरेखनांची निवड
या भिंतीवर चित्रे रेखाटण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ५५ आरेखने तयार केली होती. त्यापैकी ११ आरेखने निवडण्यात आली, अशी माहिती महाविद्यालयातील प्रा. तुषार पोतदार यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student sent message about swachh mumbai from painting
First published on: 14-03-2016 at 03:02 IST