नोकरीचाकरी करून ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’तर्फे (आयडॉल) परीक्षा देणाऱ्या ‘बीएससी-आयटी’ विषयाच्या विद्यार्थ्यांनाही नियमित विद्यार्थ्यांसाठीची ८०-२० ही मूल्यांकन योजना लागू करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत २० गुणांचे अंतर्गत मूल्यांकन करावे लागते. मात्र परीक्षा तोंडावर आली तरी हे मूल्यांकन कसे करायचे याबाबत स्पष्टता नसल्याने मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या विषयाच्या लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थी गोंधळून जाण्याची शक्यता आहे.
या योजनेत ८० गुणांची लेखी व २० गुणांचे अंतर्गत मूल्यांकन असे विभाजन असते. महाविद्यालयांमध्ये नियमित विद्यार्थ्यांकरिता असे मूल्यांकन करता येणे शक्य आहे, परंतु नोकरीचाकरी करून शिकू इच्छिणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या मार्गदर्शन व्याख्यानांनाही हजेरी लावत नाहीत. त्यात अंतर्गत मूल्यांकनाला कसा प्रतिसाद देणार असा प्रश्न आहे.
दुसरे म्हणजे अंतर्गत मूल्यांकनाचे स्वरूप स्पष्ट न करताच बीएससी-आयटीच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सत्राच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यामुळे या सत्रांकरिता अंतर्गत मूल्यांकनच होऊ शकलेले नाही. या संदर्भातील निर्णयावर विद्वत व व्यवस्थापन परिषदेने डिसेंबर महिन्यात शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे हा बदल लागू करायचा झाला तर तो पुढील शैक्षणिक वर्षांपासून आणि तोही बीएससीच्या पहिल्या वर्षांपासून लागू करायला हवा, असे माजी अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले. मात्र याच वर्षांत हा बदल लागू करण्याच्या अट्टहासापोटी नियम तर धाब्यावर बसविले जात आहेत. शिवाय विद्यार्थ्यांचाही गोंधळ उडणार आहे, अशी तक्रार त्यांनी केली. विद्यापीठ कुलसचिव एम. ए. खान यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाविषयी कल्पना असल्याचा दावा केला. अंतर्गत मूल्यांकन कसे असावे याचे स्पष्टीकरण करणारे परिपत्रक तसेच अधिसूचना आम्ही अद्याप काढली नाही, परंतु ते आम्ही लवकरच काढू, असे त्यांनी स्पष्ट केले.