नेत्याची शान ही त्याच्या कुर्त्यांच्या ‘सफेदी की चमकार’वरून ठरते. पण आता हे चित्र बदलू लागले आहे. आजकाल पांढऱ्या रंगाबरोबरच गुलाबी, आकाशी, बदामी या फिक्कट रंगांनासुद्धा पसंती दिली जाऊ लागली आहे. अनेक नेते हिरवा, राखाडी, निळा अशा गडद रंगांवरही पसंतीची मोहोर उमटवत आहेत.
यंदा तरुण मतदारांचा मोठा बोलबाला आहे. या तरुणांचे लक्ष सर्वप्रथम जाते ते नेत्याच्या दिसण्यावर, व्यक्तिमत्वावर. सोनिया गांधीच्या साडय़ांच्या वैविध्यापासून ते मोदींच्या आखूड बाहीच्या कुर्त्यांपर्यंत सगळ्या स्टाइलच्या चर्चा कॉलेज कट्टय़ांवर रंगताहेत. त्यामुळेच आता नेत्यांना आपल्या पेहरावाकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज भासू लागली आहे.
वांद्रय़ाच्या ‘माधव मेन्स मोड’ला नेत्यांची वर्दळ सवयीचीच आहे. गेली ३०-३५वर्ष राज्यातीलच नव्हे तर देशभरातील अनेक नेत्यांचे कपडे येथे शिवले जाताहेत. ‘माधव मेन्स मोड’चे मालक माधव अवस्थी यांनी सांगितले की, नेत्याचा पेहराव तयार करताना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा बारकाईने विचार करावा लागतो. लालकृष्ण अडवाणींची प्रथम पसंती तीन बटनांच्या जॅकेटला असते. शरद पवार तुम्हाला नेहमीच सफेद शर्ट-पॅण्टमध्ये दिसतील. फारुक अब्दुल्ला, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील या मंडळींना स्टायलिश पेहराव आवडतो. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे आदींना मात्र पांढरा कुर्ता आणि पायजमाच आवडतो.
गेल्या अनेक वर्षांत नेत्यांच्या पेहरावात आमूलाग्र बदल झाले आहेत. कपडय़ांबाबतची जागरुकता वाढली आहे. आता नेत्यांना ढगळ कपडे आवडत नाहीत. तसेच खादीपेक्षा हल्ली लिनिनच्या कापडाकडे अधिक ओढा आहे. थंडीत लोकरीला मागणी असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जाड कापड आवडत असे. त्यांच्या शाली खास काश्मीरवरून मागवल्या जात. बदामी, नारंगी रंगाच्या सिल्कच्या लांब शाली त्यांना आवडत, अशी माहिती माधव अवस्थी यांनी दिली.
महालक्ष्मीच्या ‘गबाना’मध्येसुध्दा नेत्यांची हजेरी असते. आजही सफेद कुर्ता, पायजमा, जॅकेट यांना मागणी आहे. नेते सहसा नैसर्गिक रंगाच्या कापडाला अधिक पसंती देतात, असे ‘गबाना’चे निरीक्षण आहे. एरवी नेत्यांच्या मागणी आणि गरजेनुसार कपडे शिवले जातात. पण निवडणुकीच्या वेळी सभेसाठी किंवा मोच्र्यासाठी १-२ दिवसांमध्ये कपडे शिवले जातात, असे ‘गबाना’तर्फे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stylish political leaders
First published on: 07-04-2014 at 02:22 IST