पालकमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मुंबई शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांची समस्या दूर केली जाणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. येत्या शनिवापर्यंत याबाबतचा अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतर खड्डय़ांचा प्रश्न निकाली काढला जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

गणेशोत्सव पूर्वतयारीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात आज बैठक घेण्यात आली. गणेशाचे आगमन आणि विसर्जन आदी मुद्दय़ांवर या वेळी साधकबाधक चर्चा करण्यात आली. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर या वेळी चर्चा करण्यात आली. या वर्षांपासून गणेश मंडळांना ऑनलाइन नोंदणीची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यावर काहींनी सूचना कळवल्या. ऑनलाइनसोबत ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, देसाई म्हणाले, ऑनलाइन पद्धत योग्य असून यामुळे एकाच ठिकाणी पोलीस, महापालिका, अग्निशमन दलाचा परवाना प्राप्त होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मंडळाच्या प्रतिनिधींना वॉर्डनिहाय प्रशिक्षण देण्याची तयारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दर्शविली. त्याला सर्वानी सहमती दिली.

रस्त्यावरील खड्डय़ांच्या बाबतीत देसाई म्हणाले, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व खड्डय़ांचा अहवाल तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. आठवडाभरात कारवाईचा अहवाल सादर केला जाणार आहे. येत्या शनिवारी अहवाल येणार आहे. त्यावर चर्चा करून उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे भरले जातील. आयुक्तांनी तशा सूचना दिलेल्या आहेत. शनिवारी याचा अहवाल त्या खात्यातील अधिकारी सादर करणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरले जातील.

दरम्यान, शांतता क्षेत्र, छोटय़ा गल्ल्यांतील गणेश मंडळांच्या अडचणी आदी मुद्दय़ांवर या वेळी चर्चा करण्यात आली. या वेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, आमदार अजय चौधरी, मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबई महानगरपालिका उपायुक्त सुधीर नाईक, नौदलाचे अधिकारी रमेश कुमार नायर, मेरिटाइम बोर्डाचे प्रतिनिधी, मुंबई, बृहन्मुंबई आणि उपनगर समन्वय समितीचे सदस्य तसेच विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विसर्जनासाठी तात्पुरती जेट्टी उभारण्यावर चर्चा

विसर्जनासाठी चौपाटय़ांवर तात्पुरत्या स्वरूपातील जेट्टी उभारण्यावर या वेळी चर्चा करण्यात आली. यामुळे चौपटीवर उशिरापर्यंत चालणारे विसर्जन विनाविलंब सुरळीत पार पडेल. तसेच किनाऱ्यापासून दूर अंतरावर मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल. यामुळे मूर्तीचे निर्माल्य किनाऱ्यावर येणार नाही. जेट्टी उभारण्याबाबत सर्व बाबी तपासून एका आठवडय़ात निर्णय घेतला जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash desai bad road conditions
First published on: 02-08-2018 at 01:48 IST