आलिशान गाडय़ा खरेदीस उपनगरांत पसंती; आठ महिन्यांत ५० लाखांहून अधिक किमतीच्या ६५८ वाहनांची नोंदणी

जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अंधेरी आरटीओत ५० लाखांहून अधिक किमतीच्या ४९२ वाहनांची नोंदणी झाली असून करापोटी ६२ कोटी ३९ लाख ३८ हजार ४९५ रुपये मिळाले.

आलिशान गाडय़ा खरेदीस उपनगरांत पसंती; आठ महिन्यांत ५० लाखांहून अधिक किमतीच्या ६५८ वाहनांची नोंदणी
(संग्रहित छायाचित्र)

सुशांत मोरे

मुंबई : आलिशान गाडय़ा खरेदीचा सोस फक्त मुंबईतील मध्यवर्ती वस्तीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये अगदी अलिकडेपर्यंत दिसून येत असे. गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले असून यंदा महागडय़ा गाडय़ा खरेदी करण्यात उपनगरांतील वाहनप्रेमींचा सर्वाधिक उत्साह दिसून आला आहे.

 जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अंधेरी आरटीओत ५० लाखांहून अधिक किमतीच्या ४९२ वाहनांची नोंदणी झाली असून करापोटी ६२ कोटी ३९ लाख ३८ हजार ४९५ रुपये मिळाले. मर्सिडीज बेन्झ कंपनीच्या तब्बल २१६ वाहनांची खरेदी झाली. त्यापाठोपाठ बीएमडब्लू कंपनीच्या १४० वाहनांची नोंद झाल्याची माहिती आरटीओतील अधिकाऱ्यांनी दिली. बोरिवली आरटीओत १६६ वाहनांची नोंदणी झाली असून करापोटी १९ कोटी ३३ लाख ९१ हजार ०९१ रुपये मिळाले. मर्सिडीज बेन्जच्या ८२ आणि बीएमडब्लूच्या ५५ वाहनांची खरेदी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अधिक कर असूनही.. महागडय़ा वाहनांवर १३ टक्के व त्यापेक्षा जास्त कर आकारला जातो. त्यामुळे अंधेरी आणि बोरिवली आरटीओला करापोटी ८१ कोटी ७३ लाख २९ हजार रुपये मिळाले आहेत. या दोन्ही आरटीओंत सर्वाधिक चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. बोरिवली आरटीओत विजेवर धावणाऱ्या एका वाहनाची नोंद झाली आहे. दरम्यान, ताडदेव आणि वडाळा आरटीओकडून याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

करोनाकाळातही..

करोनाच्या सुरुवातीच्या काळातही एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओत मिळून तीन हजार ६७९ आलिशान अशा महागडय़ा गाडय़ांची नोंदणी झाली होती. त्या वेळीही आरटीओला करापोटी कोटय़वधी रुपये मिळाले होते.

घडले काय?

जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत येथे ५० लाखांहून अधिक किमतीच्या ६५८ वाहनांची खरेदी करण्यात आल्याची माहिती बोरिवली आणि अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अधिकाऱ्यांनी दिली.दोन्ही कार्यालयांना करापोटी ८१ कोटी ७३ लाख २९ हजार रुपये महसूल मिळाला.

कारण काय?

उपनगरांतील नागरिकांमध्ये आलिशान गाडय़ांचे आकर्षण हळूहळू वाढत चालले आहे. त्यामुळे  ठाणे-डोंबिवली-बदलापूर, नवी मुंबई-पनवेल परिसरासह पश्चिम उपनगरांत महागडय़ा गाडय़ा खरेदी होत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suburban preference buying luxury cars registration 658 vehicles worth ysh

Next Story
कुपोषणामुळे मृत्यूंची संख्या कमी होत नसल्याने चिंता; उच्च न्यायालयाची टिप्पणी; पालघर येथील घटनेचीही दखल 
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी