सुदीप नगरकर लेखक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. दिवाळी, मे महिना आणि ख्रिसमच्या सुट्टीत अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज अवांतर वाचनही खूप केले जायचे. शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असल्याने त्या वयात आणि पुढेही इंग्रजी पुस्तकांचेच वाचन अधिक प्रमाणात झाले. असे असले तरीही इंग्रजीप्रमाणेच मराठी साहित्यही मी वाचतो. ‘शाळा’ आणि अन्य काही पुस्तके वाचली आहेत. तेव्हा पुस्तके विकत घेऊन वाचण्यापेक्षा ग्रंथालयातून आणून जास्त प्रमाणात वाचली आहेत. ‘चाचा चौधरी’, ‘आरडी बॉइज’, ‘टीन टीन’, ‘कॉमिक्स’ अशी पुस्तके त्या वेळी वाचल्याचे आठवते.

मी सेंट जॉन हायस्कूलचा विद्यार्थी. शाळेत खास वाचनासाठी म्हणून आठवडय़ातून दोन तास फक्त अवांतर विषयावरील पुस्तकांच्या वाचनासाठी दिले जायचे. मला वाचनाची आवड होतीच त्यात शाळेत वाचनासाठी वेळ दिला गेल्यामुळे भरपूर वाचन झाले. अमुकच पुस्तके वाचायची असे काही बंधन तेव्हा नव्हते. पण ज्ञान आणि मनोरंजन यांचा समन्वय साधला जाईल, अशा पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांकडून कसे होईल याची काळजी  शिक्षकांनी घेतली.

पुढे जेफेरी आर्चर, रवींद्रनाथ टागोर, डॅम ब्राऊन, चंपा लाहिरी अशी लेखक मंडळी आणि त्यांची पुस्तके जीवनात आली. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी ‘ऑनलाइन’ पुस्तके विकत घेण्याची आत्तासारखी सोय नव्हती. ठाण्यात असलेल्या एक/दोन मोठय़ा पुस्तकांच्या दुकानातून पुस्तके मिळायची. ठाण्याबाहेर जाऊन पुस्तके विकत घेणेही फारसे काही केले नाही. त्यामुळे ग्रंथालयातून पुस्तके आणून वाचणे यावरच प्रामुख्याने भर असायचा. इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे विचार करणे आणि लिहिणे हे इंग्रजी भाषेतूनच झाले होते. साहजिकच इंग्रजी पुस्तकांचे वाचन जास्त झाले. इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाखेरीज वृत्तपत्रे, एनसायक्लोपीडिया याचेही वाचन केले. प्रेमकथा, थ्रीलर आदी विषयांवरील पुस्तके तेव्हा वाचली. पुढे अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेत असताना तुलनेत वाचन कमी झाले. वाचनाने मला स्वत:ला खूप समृद्ध केले. आज मी लेखक म्हणून दिसतो आहे त्याचा पाया काही वर्षांपूर्वी झालेल्या भरपूर वाचनाने घातला गेला असे म्हटले तरी चालेल. चांगला लेखक व्हायचे असेल तर भरपूर वाचन करणे आवश्यक आहे. हे वाचनही विशिष्ट प्रकारचे किंवा अमुकच लेखकाचे असे असता कामा नये. विविध विषयांवरील मिळतील ती भरपूर पुस्तके वाचली पाहिजेत.

पुस्तकांचे वाचन करताना एखादा लेखक कथा किंवा कादंबरीची सुरुवात व शेवट कसा करतो, कथा/कादंबरीतील प्रसंग कसे उभे करतो, एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात कसा जातो, त्यातील विविध व्यक्तिरेखा तो कशा साकारतो याकडे मी अभ्यास या दृष्टीने पाहायचो व पाहतो. वेगवेगळे लेखक आणि वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचल्यामुळे लेखनातील हे बारकावे मला समजले. डॅम ब्राऊन हा लेखक मला खूप आवडतो. त्याचे लेखन साधे व सोपे असते. छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून ते खूप छान प्रकारे व्यक्त होतात. चंपा लहेरी यांच्या लेखनात भावभावनांवर अधिक भर असतो. ‘रिच डॅड पुअर डॅड’ हे पुस्तक मला खूप भावले. आपण आपल्या पायावर कसे उभे राहिले पाहिजे, ते त्या पुस्तकातून शिकायला मिळाले. ‘मेनी लाइफ मेनी मास्टर्स’ या पुस्तकातून मला आयुष्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने कसे पाहायचे याचा वस्तुपाठ मिळाला. जेफरी आर्चर यांच्याही लेखनातून खूप काही शिकायला मिळाले.

स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक किंवा विविध सामाजिक माध्यमांमुळे आजच्या तरुण पिढीचे वाचन हळूहळू कमी होत चालले असल्याचे बोलले जाते. मला मात्र तसे वाटत नाही. लोक वाचत आहेत. इंग्रजी भाषेतील पुस्तकेही वाचत आहेत. मुंबई, पुणे अशा शहरी भागांसह राज्याच्या ग्रामीण भागातील तरुण पिढीही इंग्रजी पुस्तके वाचत आहे. काळानुरूप वाचनाच्या प्रकारात थोडा बदल झाला आहे. भरमसाट पृष्ठसंख्या असलेल्या पुस्तकांपेक्षा मोजक्या पृष्ठसंख्येची पुस्तके तसेच हलके-फुलके जास्त प्रमाणात वाचले जात आहे. सामाजिक माध्यम आणि ब्लॉग हे आजच्या पिढीला व्यक्त होण्यासाठी एक सशक्त माध्यम आहे. अनेक जण या माध्यमाच्या साहाय्याने लिहीत आहेत. आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र असे असले तरी काही जण व्यक्त होत नाहीत. काय लिहू, कसे लिहू, आपण लिहू ते वाचले जाईल का, अशा शंका त्यांच्या मनात असतात. पण या सर्व शंका मनातून काढून टाकून लिहीत राहा. लेखकाने लिहिलेले काही वाचले की अरे हे तर सोपे आहे, आपणही लिहू शकू असे अनेकांना वाटते. पण लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. आई-वडिलांनी आपल्या पाल्यामध्ये पुस्तकांच्या वाचनाची आवड जाणीवपूर्वक निर्माण करावी. मात्र आपली आवड त्यांच्यावर लादू नये. तसे केले तर कदाचित वाचनाची आवड निर्माण होण्याऐवजी तिटकाराच येईल. त्यांना जे आवडते ते त्यांना वाचू द्यावे. गंभीर किंवा जड विषयांपेक्षा हलके-फुलके वाचन त्यांना करू द्या. वाचनाची आवड विकसित झाली की तो आपोआपच वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचायला लागेल आणि भविष्यात सुजाण व चोखंदळ वाचक तयार होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudeep nagarkar bookshelf
First published on: 15-06-2017 at 02:29 IST