निशांत सरवणकर

म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करताना प्रत्येक चौरस फुटामागे खुल्या बाजारात विक्रीसाठी मिळणारे चटईक्षेत्रफळ कमी असल्याचा दावा विकासकांनी केला असला तरी नगरविकास विभाग मात्र ते मान्य करायला तयार नाही.

चटईक्षेत्रफळ वाढवून द्यायला आमचा नकार नाही. परंतु म्हाडासारख्या वसाहतींना खरोखरच त्याची गरज आहे का, हे तपासून पाहणे आवश्यक असल्याचे मत नगरविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले.

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) व या जुन्या इमारतींच्या समूह पुनर्विकासासाठी ३३(९) ही तरतूद आहे. झोपडपट्टी पुनर्विकासासाठी ३३ (१०) ही नियमावली लागू आहे. या सर्व योजना विकसित करताना विकासकांना प्रत्येक चौरस फुटामागे १.४ ते १.२ चौरस फूट चटईक्षेत्रफळ मिळत असताना म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना प्रत्येक चौरस फुटामागे फक्त ०.६  (शून्य पूर्णाक सहा) इतके चटईक्षेत्रफळ मिळते, अशी ओरड विकासकांकडून केली जात आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले आहे.

नगरविकास विभागाने म्हटले आहे की, म्हाडा वसाहतींचे अभिन्यास जुने असून ते पूर्णपणे तयार आहेत. या अभिन्यासामध्ये विकासकाला रस्ते वा इतर पायाभूत सुविधांसाठी फार खर्च करावा लागत नाही. याउलट जुन्या इमारतींची स्थिती आहे. या ठिकाणी विकासकाला सर्वच पायाभूत सुविधा, प्रसंगी रस्तेही तयार करून द्यावे लागत आहेत. याशिवाय समूह पुनर्विकासाला शासनाने प्राधान्य दिले आहे. अशा वेळी समुह पुनर्विकास असो किंवा जुन्या इमारतींचा एकल विकास असो, या विकासकांना त्यामुळे प्रत्येक चौरस फुटामागे जादा चटईक्षेत्रफळ मिळाले तर प्रकल्प व्यवहार्य होणार आहे. तशी परिस्थिती म्हाडाची नाही. म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास झाल्यास निर्माण होणारे चटईक्षेत्रफळ भरमसाठ आहे. परंतु म्हाडा वसाहतींचा तुकडय़ा तुकडय़ाने पुनर्विकास करण्यात विकासकांना रस असल्यामुळेच त्यांना जादा चटईक्षेत्रफळ हवे आहे, याकडे या सूत्रांनी लक्ष वेधले. पुनर्विकास वेगाने व्हावा यासाठी चटईक्षेत्रफळ वाढवून देण्यास नगरविकास विभागाचा अजिबात विरोध नाही. परंतु त्यासाठी काहीतरी संयुक्तिक प्रस्ताव म्हाडाकडून यावा, याकडेही या सूत्रांनी लक्ष वेधले.