दुधातील स्निग्ध घटकांपासून इतर पदार्थ तयार करून बक्कळ नफा कमवताना उरलेल्या पातळ पाणीसदृश दुधात चक्क साखर घोळवून विकण्याचा ‘उद्योग’ समोर आला आहे. मॉलमध्ये चकाचक वेष्टनांमधून दुधाच्या दर्जाची हमी देणाऱ्या मोठय़ा कंपन्यांच्या दुधात अशा प्रकारची ‘भेसळ’ आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीही चक्रावले आहेत.
दुधापासून तूप, लोणी, चीज तयार करून शेकडो रुपये किलोने विकले जाते. या बडय़ा कंपन्या ग्राहकांना दुधातून मात्र साखर विकत आहेत. झोपडपट्टीमध्ये दुधात पाण्याची भेसळ करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसी कारवाई होत असली तरी रोज लाखो लिटर दुधाचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या मात्र नामानिराळ्या राहतात. जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दूधभेसळीच्या समस्येबाबत चिंता व्यक्त केली होती. दूधभेसळीबाबत सर्वच राज्यांनी कडक कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दूधभेसळीबाबत राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू झाली, असे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
दुधातील स्निग्ध पदार्थ व स्निग्ध नसलेले घन घटकांचे कमी झालेले प्रमाण अपेक्षित पातळीपर्यंत वाढवण्यासाठी त्यात साखर, स्टार्च तसेच तेल टाकण्याचे उद्योग केले जातात.
अन्न व औषध प्रशासनाने मुंबई व ठाणे येथे ९ डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत ८१ नमुन्यांपैकी सहा नमुन्यात साखरेचे प्रमाण आढळले. त्यात मुंबईतील महानंद डेअरी, बोईसर येथील गुजरात को-ऑप. मिल्क फेडरेशन (अमूल), बोईसर येथील वसुंधरा डेअरी, खोपोलीमधील शासकीय दूध योजना, तुर्भे येथील कोल्हापूर जिल्हा सहकारी उत्पादक संघ आणि सांगली येथील चितळे यांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2014 रोजी प्रकाशित
पातळ दुधाचा दर्जा टिकवण्यासाठी साखरेची भेसळ
दुधातील स्निग्ध घटकांपासून इतर पदार्थ तयार करून बक्कळ नफा कमवताना उरलेल्या पातळ पाणीसदृश दुधात चक्क साखर घोळवून विकण्याचा 'उद्योग' समोर आला आहे.

First published on: 17-12-2014 at 02:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar mixture to maintain the quality of thin milk