चंद्रपूर, ब्रह्मपुरीत तापमान ४६ अंशांवर
राज्यात मराठवाडय़ासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेचा पारा चढाच असून गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या कडाक्यात वाढ झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर व ब्रम्हपुरी या दोन शहरांनी शनिवारी तापमानाचा उच्चांक नोंदवला. या दोन्ही शहरांत पारा ४६ अंश सेल्सिअस इतका होता. देशातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे तापमान या दोन शहरांत नोंदवले गेले. राज्यात उष्णतेची लाट अजून तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या लाटेने रात्रीही उकाडा जाणवत असल्याने लोक त्रस्त आहेत.
उष्णतेचा कहर यंदा मे महिन्यात वाढीस लागला असून जून महिन्यापर्यंत उष्म्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात हा उष्णतेचा कहर अधिक असून शुक्रवारी व शनिवारी जळगावात पारा ४४.२ अंशाच्या वर पोहोचला होता, तर शुक्रवारी नांदेडमध्येही पारा ४४.५ अंश सेल्सियसवर स्थिरावला होता. याहीपेक्षा शनिवारी मराठवाडय़ातील परभणीत ४५.० अंश से. तापमान नोंदवले गेले आहे.
नागपुरात मोसमातील सर्वाधिक म्हणजे ४५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्यापाठोपाठ वर्धा शहरात ४५.५ अंश सेल्सिअस तरअकोला, गोंदिया, यवतमाळ शहरातही तापमान ४४ अंश सेल्सिअसपुढे होते. चंद्रपुरात अवकाळी पावसानेही तापमानात फरक न पडता उष्मा वाढलेलाच आहे.